Milk Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! शेतकऱ्यांच्या मागणीमुळे ग्राहकांचं वाढलं टेन्शन; दूध आणखी महागणार?

Milk Price Hike : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे.
Photo -  Social Media
Milk Price Hike : Milk Price Hike :
Published on: 
Updated on: 
  • सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री!

  • शेतकऱ्यांच्या मागणीमुळे ग्राहकांचं वाढलं टेन्शन

  • दूध आणखी महागणार?

Milk Price Hike : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत असताना आता आणखी एक फटका बसणार आहे. रोजच्या स्वयंपाक घरातील आवश्यक गोष्टींपैकी एक गोष्ट आता महाग होणार आहे. दुधाचे दर आणखी वाढणार आहेत. नुकतेच दुधाच्या दरांत वाढ झाली होती. मात्र काही काळानंतर पुन्हा दुधाचे दर कडाडणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

पंजाबच्या प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशन PDFA ने दूध खरेदी दरात किमान ४ रुपये प्रति किलोग्रॅमने तात्काळ वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेने लुधियानाच्या जिल्हाधिकारी (DC) कार्यालयात मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून एक निवेदन सादर केले आहे. त्यात, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्य सरकार आणि दूध प्रक्रिया केंद्रांविरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

वाढता पशुखाद्य आणि इतर खर्च ही वाढत्या दरांची कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. PDFA चे अध्यक्ष दलजीत सिंग गिल यांच्या मते, पशुखाद्य, मका, सोयाबीन पेंड, मोहरी पेंड, हिरवा चारा आणि जनावरांच्या औषधांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मक्याचा भाव २,१०० रुपयांवरून ३,३०० रुपये प्रति क्विंटल, सोयाबीनचा भाव ४,५०० रुपयांवरून ७,००० रुपयांपर्यंत, मोहरीच्या पेंडीचा भाव ३,००० रुपयांवरून ४,२०० रुपये प्रति क्विंटल आणि भाताच्या पेंढ्याचा भाव ३५० रुपयांवरून १,३०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. पोषक घटकांच्या किमतीतही जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवरीला वाढता बोझा

संघटनेने स्पष्ट केलं की, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव वाढत चालला आहे. त्यांचा आरोप आहे की, मिल्कफेड आणि खाजगी दूध कंपन्यांनी बाजारात दुधाचा किरकोळ भाव प्रति लिटर ४ ते ६ रुपयांनी वाढवला आहे, पण ही दरवाढ दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील बोझा जैसे थेच आहे.

संघटनेने असेही म्हटले आहे की, कर्नाटक, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुक्रमे प्रति किलो ७, ५ आणि ६ रुपयांचे अनुदान देऊन फायदा मिळवून दिला आहे, तर पंजाबने दूध खरेदीचे दर वाढवलेले नाहीत किंवा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिलेली नाही.

ब्रीडिंग पॉलिसी मागे घेण्याची मागणी

दुधाच्या वाढत्या किमतींव्यतिरिक्त, संघटनेने पंजाबचे प्रजनन धोरण मागे घेण्याचीही मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, या धोरणातील नियमांमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी आणि कृत्रिम रेतन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा येत आहे. पीडीएफएच्या अध्यक्षांचा दावा आहे की, या धोरणामुळे गायी आणि म्हशींच्या जाती सुधारण्याच्या प्रयत्नांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

त्यांनी कृत्रिम रेतनासाठी आवश्यक मनुष्यबळावरील निर्बंध, वीर्य साठवणुकीशी संबंधित नियम, अतिरिक्त खर्च, कागदपत्रे आणि गर्भ हस्तांतरण तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, या नियमांमुळे दुग्धव्यवसाय अधिक गुंतागुंतीचा आणि खर्चिक झाला आहे. त्यामुळे या व्यवसायात उतरु पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.