एक रुपयात 'पीक विमा' बंद होणार का? कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले...
नागपूर : पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची अशी ठरत आहे. याच योजनेत मोठा घोटाळा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता ही योजना बंद होईल, अशी चर्चा रंगली होती. यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ‘एक रुपयातील पीक विमा योजना बंद होणार नसून याच्या निकषात काही सुधारणा होतील’, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
केंद्र सरकारकडून शेकतऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती; परंतु ही योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्याच्या हिताची असल्याची टीका झाली. त्यानंतर राज्य शासनाने नवीन पीक विमा योजना सुरू आणली. प्रायोगिक तत्त्वावर बीड जिल्ह्यात याचा प्रयोग केल्यानंतर राज्यभरही योजना राबविण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागत आहे. इतर रक्कम शासनाकडून भरण्यात येते; परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आले. बोगस शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा काढम्यात आला. राज्यभर हा प्रकार घडला.
कृषी विभागातील घोटाळ्याची नाही माहिती
एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाला. कृषी विभागाकडून अधिकच्या दराने साहित्य खरेदी करण्यात आले. निविदाही मॅनेज असल्याचे समोर आले. याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना याबाबत विचारले असता याविषयाची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विभागातील साहित्य खरेदीचा घोटाळा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला असताना अद्याप विभागाच्या मंत्र्यांनी माहिती घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर कापूस, सोयाबीन खरेदीचा विषय पणन विभागाचा असल्याचे म्हणत बोलण्याचे टाळले.
कोट्यवधींचा हा घोटाळा
कोट्यवधींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा झाली. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे ही योजना बंद झाल्यास खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे सांगण्यात येते. परंतु ही योजना बंद होणार नसल्याचे कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले. बोगस विमा काढण्यात आला असून, कुणालाही रक्कम देण्यात आली नाही. संबंधित सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. ही योजना बंद होणार नसून यात काही सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांना माध्यमांशी बोलताना सांगितले.