PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये 'या' 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या
1. आधारची माहिती: UAN शी जोडलेला आधार आणि EPFO रेकॉर्डमधील वैयक्तिक माहिती योग्य आहे का, हे तपासा. विशेषतः नाव आणि जन्मतारखेसारख्या तपशिलांकडे लक्ष द्या.
2. PAN तपशील: UAN मध्ये नोंदवलेला PAN क्रमांक योग्य आहे का आणि त्यावरील नाव EPFO रेकॉर्डशी सुसंगत आहे का, हे पाहा.
3. बँक खाते आणि IFSC: PF ची रक्कम ज्या खात्यात जमा होणार आहे, त्या खात्याचा क्रमांक आणि IFSC अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संबंधित बँक खाते कार्यरत असल्याचीही खात्री करा.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचित घसरण, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचा भाव
4. नाव: EPFO, आधार आणि PAN मधील नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत असल्यास ती आधी दुरुस्त करणे योग्य ठरेल.
5. जन्मतारीख: UAN मध्ये नोंदवलेली जन्मतारीख योग्य आहे का, हे तपासा. सदस्याची ओळख आणि EPFO रेकॉर्डच्या दृष्टीने हा महत्त्वाचा तपशील आहे.
6. नोकरीच्या तारखा: कंपनीत रुजू झाल्याची Date of Joining आणि नोकरी सोडल्याची Date of Exit योग्य नोंदली आहे का, हेही तपासा.
EPFO ने जानेवारी 2025 मध्ये सदस्यांच्या प्रोफाइलमधील माहिती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुलभ केली. आधारद्वारे आधीच सत्यापित UAN असलेले सदस्य नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, आई-वडिलांचे नाव, वैवाहिक स्थिती तसेच नोकरीत रुजू होण्याची आणि बाहेर पडण्याची तारीख यासारखे अनेक तपशील पात्र प्रकरणांमध्ये स्वतः अपडेट करू शकतात. मात्र, 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी मिळालेल्या काही UAN प्रकरणांमध्ये नियोक्त्याच्या प्रमाणीकरणाची आवश्यकता लागू शकते.
एप्रिल 2025 मध्ये EPFO ने आणखी एक महत्त्वाचा बदल केला. UAN सोबत बँक खात्याचे तपशील जोडण्यासाठी बँकेकडून पडताळणी झाल्यानंतर नियोक्त्याची मंजुरी घेण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली. तसेच ऑनलाइन दावा करताना चेक किंवा सत्यापित बँक पासबुकची प्रत अपलोड करण्याची अटही हटवण्यात आली.
PF काढण्यासाठी एजंट किंवा अनोळखी व्यक्तीची मदत घेताना विशेष खबरदारी आवश्यक आहे. EPFO स्वतः सदस्यांना UAN, पासवर्ड, PAN, आधार, बँक खात्याचे तपशील किंवा OTP कुणासोबतही शेअर करू नका, असा इशारा देते. EPFO फोन, मेसेज किंवा सोशल मीडियावरून अशी संवेदनशील माहिती मागत नसल्याचेही अधिकृत पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे PF काढण्याची घाई करण्याऐवजी दावा दाखल करण्यापूर्वी काही मिनिटे देऊन सर्व माहिती तपासणे फायद्याचे ठरू शकते. तपशिलांमध्ये चूक आढळल्यास प्रथम ती दुरुस्त करून त्यानंतरच ऑनलाइन दावा दाखल करणे योग्य ठरेल.






