फोटो सौजन्य - Social Media
संपूर्ण भारतातील ग्रामीण वित्तीय संस्थांच्या (आरएफआय) सायबर सुरक्षेला बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट (बीआयआरडी), लखनौसोबत धोरणात्मक सहयोग जाहीर केला आहे. या भागीदारीचा उद्देश वाढत्या सायबर जोखमींना तोंड देणे आणि सुरक्षित आर्थिक समावेशनासाठी एक ठोस डिजिटल इकोसिस्टम निर्माण करणे हा आहे. क्विक हीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी आणि बीआयआरडी लखनौचे संचालक श्री. निरूपम मेहरोत्रा यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी करत या सहकार्याला अधिकृत मान्यता दिली.
या भागीदारीच्या माध्यमातून आरएफआयला सुरक्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. क्विक हीलच्या तीन दशकांच्या सायबर सुरक्षा कौशल्याचा आणि भारतातील सर्वात मोठ्या फॅसिलिटी सिक्युरिटी लॅब्सच्या अनुभवाचा लाभ घेत बीआयआरडीच्या लखनौ केंद्रात प्रगत सायबर सिक्युरिटी लॅब स्थापन केली जाणार आहे. या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर भर दिला जाईल. तसेच, दोन्ही संस्थांच्या संयुक्त संशोधनाद्वारे सायबर सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावशीलतेचे मूल्यमापन केले जाईल. आरएफआयच्या विद्यमान तांत्रिक पायाभूत सुविधांचे विश्लेषण केले जाईल आणि सुरक्षा उपायांसंबंधी असलेल्या तफावतींवर लक्ष केंद्रित केले जाईल. या सहकार्याच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण मॉड्यूल्स विकसित करण्यात येणार असून, सायबर सुरक्षेशी संबंधित कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. याद्वारे फसवणूक प्रतिबंधासाठी प्रभावी पद्धती विकसित करण्यात मदत होईल.
याशिवाय, धोरणात्मक सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ पथके कार्यरत असतील. उदयोन्मुख सायबर जोखीमांविरोधात आरएफआयच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी सायबर ड्रिल्स आयोजित केल्या जातील. तसेच, सायबर सुरक्षा आणि ग्रामीण वित्तपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि भागधारकांना जोडण्यासाठी नॉलेज एक्सचेंज प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. या भागीदारीच्या माध्यमातून वित्तीय संस्थांना सायबर सुरक्षिततेसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्हणाले, “ग्रामीण भारत डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर असताना, वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षेला मजबूत करणे आवश्यक आहे. ग्रामीण वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक तुलनेने कमी असली, तरी सायबर हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मोठे असते. म्हणूनच, बीआयआरडीसोबतची ही भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. क्विक हीलच्या सायबर सुरक्षा कौशल्याचा आणि बीआयआरडीच्या ग्रामीण वित्तपुरवठ्यातील सखोल अनुभवाचा समन्वय करून, आम्ही सुरक्षित आर्थिक प्रणालीसाठी एक भक्कम मंच उभारत आहोत. संशोधन अभ्यास, सायबर सुरक्षा प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून, आम्ही आरएफआयला आवश्यक सुरक्षा उपाय, धोरणे आणि माहिती पुरवून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सशक्त होईल आणि डिजिटल युगात सुरक्षित आर्थिक व्यवहार सुनिश्चित केले जातील.”