फोटो सौजन्य- iStock
कॉम्प्युटर प्रोसेसरची जगविख्यात कंपनी असलेल्या इंटेल ( intel) कंपनीवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यात स्पर्धाही खूप असल्याने ही कंपनी क्वालकॉमच्या (qualcomm) ताब्यामध्ये जाऊ शकते. क्वालकॉम आणि इंटेल या जगातील दोन आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या एकत्र येऊ शकतात. एका माध्यम अहवालानुसार, स्मार्टफोन चिप्ससाठी प्रसिद्ध असलेली क्वालकॉम ही कंपनी आता संगणक प्रोसेसर बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी इंटेलचे अधिग्रहण करण्याचा विचार करत आहे. टेक क्षेत्रातील या बातमीने खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, क्वालकॉमकडून याबाबत इंटेलशी चर्चा केली आहे. दरम्यान, हा करार अद्याप पूर्ण झालेला नाही कारण तो पूर्ण होण्यामध्ये अनेक कायदेशीर अडथळे येऊ शकतात. या संभाव्य अधिग्रहणावर अजूनपर्यंत क्वालकॉम किंवा इंटेल या दोन्ही कंपन्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
इंटेलची आर्थिक कामगिरी
मागील काही वर्षांतील इंटेलची कामगिरी खालावली आहे. कंपनीने नुकतेच 1.6 अब्ज डॉलरचे भारतीय रुपयामध्ये तब्बल 13,400 कोटी चे नुकसान नोंदवले आहे. या कामगिरीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे. इंटेलकडून 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या उतरत्या कामगिरीचा शेअर्सवरही मोठा परिणाम झाला असून इंटेलच्या शेअर्सची किंमत 60% ने घसरली आहे, यामुळे कंपनीचे एकूण बाजारमुल्य हे 87 अब्ज डॉलर ( 7.3 लाख कोटी) पर्यंत खाली आले आहे.
जुन्या ग्राहकाने साथ सोडल्याचा परिणाम
इंटेल कंपनीला सर्वात मोठा धक्का हा 2020 साली बसला ज्यावेळी त्यांची सर्वात मोठी ग्राहक कंपनी Apple ने संगणकांसाठी इंटेलचे प्रोसेसर वापरणे बंद केले.2020 पासूनच Apple ने स्वत: डिझाइन केलेल्या एम सिरीज चिप्स वापरण्यास सरुवात केली ही सिरीज एआरएम आर्किटेक्चरवर आधारित आहेत.
क्वालकॉमची संगणक बाजारात विस्ताराची योजना
क्वालकॉम ही कंपनी आपल्या सुपरस्पीड स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. कंपनीकडून संगणक बाजारातही विस्तार सुरु केला आहे. अलीकडेच क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन एक्स प्लस आणि स्नॅपड्रॅगन एक्स एलिट चिप्स लाँच केल्या आहेत. या चिप्सचे त्यांच्या AI क्षमता आणि कार्यक्षमतेसाठी कौतुक केले जात आहे. जर क्वालकॉमचे इंटेलबरोबरील संभाव्य अधिग्रहण यशस्वी झाले तर संगणक आणि सर्व्हर मार्केटमध्ये ही कंपनी जागतिक स्तरावर क्रमांक 1 ची कंपनी ठरेल.