फोटो सौजन्य - Social Media
कोणालाही वाटलं नसतं की कॉलेजमध्ये शिकवणारी एक असिस्टंट प्रोफेसर शेतीच्या क्षेत्रातही कमाल करू शकेल. पण हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील सोनिया दहिया यांनी हे शक्य करून दाखवलं. बायोटेक्नोलॉजी विषयात सखोल ज्ञान असलेल्या सोनिया एका सरकारी महाविद्यालयात अध्यापन करतात. मात्र, कोरोना काळात, जेव्हा संपूर्ण देश थांबलेला होता. त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आणि मशरूम शेतीला सुरुवात केली.
सोनिया यांना लॉकडाऊन काळात नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी इंटरनेटवरून मशरूम शेतीविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. संशोधन करत करत त्यांनी ‘डॉ. दहिया मशरूम फार्म’ नावाने एक फार्म सुरू केला. सुरुवातीला अनेक लोकांनी शंका व्यक्त केली. “सरकारी नोकरी आणि शेती एकत्र कशी सांभाळशील?” असा प्रश्न केला. पण सोनिया यांनी हे शक्य करून दाखवले आणि सिद्ध केले की जिद्द असेल, तर दोनही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता येतात.
शेती पारंपरिक नसतानाही सोनिया यांनी थेट ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. कुणासाठीही ही मोठी जोखीम असती, पण बायोटेक्नोलॉजीचं ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे त्यांचा मार्ग सुकर झाला. आज त्यांचा फार्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हवा, तापमान आणि आर्द्रता यावर नियंत्रण ठेवून ते बटन मशरूमची शेती करतात, जी कोणत्याही ऋतूशी निर्भर नाही.
दर महिन्याला १० टन मशरूम आणि लाखोंचा नफा
आज त्यांच्या फार्ममधून दर महिन्याला १० टनपर्यंत मशरूमचे उत्पादन होते आणि त्यातून लाखोंचा नफा मिळतो. एवढंच नाही तर त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार दिला आहे, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. सोनिया यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. सोनिया दहिया यांनी हे दाखवून दिलं की सरकारी नोकरी म्हणजेच सगळं काही असं नाही. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत शेतीतही यश संपादन केलं आहे. त्या आज केवळ एक प्रोफेसर नसून एक उद्योजिका आणि प्रेरणास्थान ठरल्या आहेत.