फोटो सौजन्य - Social Media
एक्सिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ईफ़िक्की), उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि अपेडा यांच्या संयुक्त पुढाकारातून पंढरपूर तालुक्यातील शिवस्वराज शेतकरी महिला उत्पादक कंपनी च्या दर्जेदार शेवग्याच्या शेंगा दुबईला निर्यात करण्यात आल्या. यूनिवर्स एक्सपोर्ट्सच्या माध्यमातून झालेली ही निर्यात उमेद संस्थेसाठी ऐतिहासिक टप्पा ठरली असून, कोपरखैरणे येथील शीतगृहातून कंटेनर रवाना करताना उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या उपक्रमात ईफ़िक्कीचे अध्यक्ष प्रवीण वानखडे, उमेदचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अपेडाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अवर सचिव धनवंत माळी, शिवस्वराज कंपनीच्या संचालक कौशल्या जाधव आणि इतर महिला संचालक मंडळ उपस्थित होते.
उमेदचे सीईओ नीलेश सागर म्हणाले, “उमेद ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कटिबद्ध आहे. आज पंढरपूरमधून दुबईला २ टन दर्जेदार शेवग्याची निर्यात होत आहे आणि महिलांना स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत ८०-९०% अधिक किंमत मिळत आहे. हे यश ईफ़िक्कीचे अध्यक्ष प्रवीण वानखडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.”
प्रविण वानखडे म्हणाले, “भारतीय शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, विशेषतः महिलांच्या नेतृत्वातील कंपन्यांना थेट परदेशी खरेदीदारांशी जोडणे, निर्यात प्रशिक्षण कार्यशाळा घेणे आणि मूल्यवर्धन साखळीच्या माध्यमातून महिलांना सर्व टप्प्यांत सहभागी करून त्यांचा नफा वाढवणे हे ईफ़िक्कीचे मुख्य उद्दिष्ट आहे.” परमेश्वर राऊत यांनी कृषी निर्यातीतील महिला उद्योजकांच्या संधीवर प्रकाश टाकला तर नागपाल लोहकरे यांनी ग्रामीण महिलांना आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली करण्यासाठी संपूर्ण पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. शेवटी शिवस्वराज कंपनीच्या संचालक कौशल्या जाधव म्हणाल्या, “शेतकऱ्याच्या पोराने शेवटी करून दाखवलंच! आज महिलांना चांगली किंमत मिळत आहे, त्यामुळे आणखी महिला अशा संधी शोधतील.” या उपक्रमासाठी ईफ़िक्की, उमेद व यूनिवर्स एक्सपोर्ट्सच्या टीमचे विशेष आभार मानण्यात आले.