फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीतील एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली अशिता सिंघल ही संघर्षाची एक उत्तम उदाहरण आहे. जिथे कल्पकतेच्या बळावर स्वप्न उभं राहिलं. आज तिचं नाव ‘पैवंद स्टुडिओ’ या फॅशन ब्रँडमुळे ओळखलं जातं, पण हे यश सहज मिळालेलं नाही. हे यश आहे जुन्या कपड्यांच्या तुकड्यांमधून नव्याने सौंदर्य शोधणाऱ्या दृष्टिकोनाचा!
अशिताचे वडील वायर आणि केबल्सच्या व्यवसायात होते, आई गृहिणी, तर भाऊ कुटुंबाचा व्यवसाय पाहत होता. घरात आर्थिक स्थैर्य असलं तरीही, अशिता काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. फॅशन डिझायनिंग शिकताना तिने पाहिलं की कित्येक चांगल्या दर्जाचे कपडे फक्त टाकले जातात. हाच क्षण तिच्या यशाची पहिली पायरी ठरली.
तिने ठरवलं ‘हे टाकाऊ नाही, उपयुक्त आहे!’ पारंपरिक हस्तकला, पेचवर्क, बुनाई, कढ़ाई यांचा वापर करून तिने कापडाच्या तुकड्यांना नवीन जीव दिला. २०१८ मध्ये तिने ‘पैवंद स्टुडिओ’ नावाचं छोटं युनिट सुरू केलं, गुंतवणूक होती फक्त २० लाखांची. पण कल्पना मोठी होती!
आज तिच्या स्टार्टअपने एक कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तिच्या डिझाईन्स लॅक्मे फॅशन वीकसारख्या मोठ्या मंचांवर झळकल्या आहेत. इंटीरियर डिझायनर्स, हॉटेल्स, आणि फॅशन ब्रँड्ससाठी ती टिकाऊ फॅब्रिक तयार करते. गेल्या काही वर्षांत अशिताने ३० हजार किलोहून अधिक कापड पुन्हा वापरात आणलं आणि सुमारे ६६ दशलक्ष लिटर पाणी वाचवलं. तिच्या उत्पादनात एकही रसायन वापरलं जात नाही, ही फक्त फॅशन नाही, ही एक जबाबदारी आहे.
ती म्हणते, “लहानपणी आजोबांनी शिकवलं होतं. फाटलेले कपडे फेकू नका, त्यांचं रूपांतर करा. आणि हेच मी आज जगासमोर मांडते आहे.” तिचं यश हे फक्त व्यवसायाचं नाही, तर पर्यावरण आणि समाजप्रती असलेल्या जाणिवेचंही उदाहरण आहे.