फोटो सौजन्य - Social Media
गुजरातमधील राजकोटमध्ये राहणाऱ्या जयदीपसिंह वाघेला यांची यशोगाथा ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. एका साध्या रिक्षा चालकाचा मुलगा म्हणून वाढलेले जयदीपसिंह यांनी शिक्षण दहावी-११वी पर्यंतच घेतलं. पण परिस्थितीवर मात करत, त्यांनी स्वतःची कंपनी उभारून कोट्यवधींचा टर्नओव्हर मिळवला आहे. जयदीपसिंह यांनी केवळ १५ वर्षांची वयात घराच्या परिस्थितीमुळे काम करण्यास सुरुवात केली. प्रारंभी एका दुकानात प्लास्टिकची उत्पादने विकणाऱ्या सहाय्यक म्हणून काम केलं, नंतर एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक लोडिंग-अनलोडिंग आणि इनव्हॉइस बनवण्याचं काम केलं. महिन्याची केवळ ३५०० रुपये पगार असलेली नोकरी करत असतानाच त्यांनी भविष्यासाठी मोठी स्वप्नं पाहिली.
नंतर त्यांनी आधार कार्ड केंद्र चालवण्यास सुरुवात केली. या कामातून महिन्याला ४५ हजार रुपये मिळायला लागले, मात्र २०१७ मध्ये सरकारने हे केंद्र बंद केल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आलं. कर्ज होते, मासिक ईएमआय भरायचा होता, पण काम नव्हतं. अशा कठीण प्रसंगीही त्यांनी हार मानली नाही.
२०१८ मध्ये त्यांनी मित्रांकडून ६ लाख रुपये उधार घेऊन ‘GJ Global’ नावाची फळ-भाजीपाला निर्यात करणारी कंपनी सुरु केली. पहिल्याच ऑर्डरमध्ये नुकसान झालं, पण त्यांनी धैर्य सोडलं नाही. चुकांमधून धडे घेत त्यांनी नव्या रणनीतीसह व्यवसाय पुन्हा उभारला. त्यांची कंपनी भारतातून अनार, ड्रॅगन फ्रूट, नारळ, बटाटे, कांदे अशा उत्पादनांचा निर्यात संयुक्त अरब अमिरात, ओमान, सौदी अरेबिया, कतार यांसारख्या देशांमध्ये करते. २०१८ मध्ये सुरू झालेली ही कंपनी २०२०-२१ मध्ये ५ कोटींचा टर्नओव्हर गाठते आणि आज १५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. आज राजकोट व दुबईमध्ये त्यांचे स्वतंत्र ऑफिसेस आहेत.
जयदीपसिंह वाघेला यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की शिक्षण अपूर्ण राहिलं तरीही मेहनत, चिकाटी, आणि योग्य निर्णय घेतल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा ठरावी अशीच आहे.