टोमॅटोच्या दरात 20 जुलैपासून घसरण होणार; वाचा... काय आहे नेमकं दर घसरणीचे कारण?
देशभरात सध्या टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. परिणामी, सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. तर सर्वसामान्यांना टोमॅटो देखील खरेदी करणे अवघड झाले आहे. मात्र, आता २० जुलैपासून देशभरातील टोमॅटोचे दर हळूहळू उतरणीला लागतील, अशी माहिती समोर येत आहे. प्रामुख्याने सध्याच्या घडीला महाराष्ट्रात टोमॅटो किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये इतक्या उच्चांकी दराने विकला जात आहे. अन्य राज्यांमध्ये देखील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये प्रति किलोदरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे.
का कमी होणार टोमॅटोचे दर?
मागील तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे दर उच्चांकी पातळीवर स्थिर आहे. मात्र, आता टोमॅटोचे दर हळूहळू कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे दक्षिण भारतातील सर्वच राज्यांमधील टोमॅटोची आवक बाजारात सुरु झाली असून, येत्या काही दिवसांत या राज्यांमधून टोमॅटोची आवक आणखी वाढणार आहे. मागील दीड महिन्यापासून टोमॅटोची बाजारातील आवक प्रभावित झाली आहे. ज्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने, टोमॅटो दराने उसळी घेतली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
‘या’ राज्यांमधून सुरु होणार आवक
सध्याच्या घडीला काही मोजक्या उत्तरेकडील राज्यांमधून बाजारात टोमॅटोची आवक होत आहे. मात्र, आता आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांसह महाराष्ट्रातील देखील अनेक भागांमध्ये आगाऊ लागवड झालेला टोमॅटो बाजारात येणार आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश चिंतूर जिल्हा आणि कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन होते. ज्यामुळे आता या भागांमधून टोमॅटोची आवक सुरु होणार आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत किरकोळ बाजारात टोमॅटो १५० रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात होता.
काय म्हटलंय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाने?
केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीसह देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील काही काळापासून या भाजीपाल्याच्या दरात झालेली मोठी वाढ कायम आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीत ७५ रुपये प्रति किलो दराने टोमॅटो उपलब्ध होत आहे. तर मुंबई, महाराष्ट्र वगळता अन्य शहरांमध्ये देखील टोमॅटोचे दर काहीसे याच पातळीवर आहेत. मात्र, आता दक्षिणेकडील राज्यांमधून टोमॅटोची आवक सुरु होणार असून, २० जुलैपासून दर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.