
एसटीच्या उत्पन्नात रोज दीड कोटीची तूट
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न ३३ कोटी रुपये आहे. दररोजची तूट एक ते दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. परिणामी, महामंडळावर आर्थिक दडपण वाढले आहे. यातून सावरण्यासाठी नवनवीन प्रयोग हाती घेतले जात आहे.
उत्पन्न कमी होण्यात बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा सांगितला जातो. वर्षभरात ८३०० नवीन बसेस खरेदी करून तो दूर करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. कोरोना महामारीपूर्वी महामंडळाकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मागील चार-पाच वर्षांत बस खरेदी रखडली. २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२६०० वर आली. परिणामी, अनेक मार्गावर फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची ओरड होत आहे.
एसटी महामंडळाच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षात २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानुसार यंदा पहिल्या टप्प्यात ८३०० बसेस खरेदी केल्या जाणार आहे. तीन बाय दोन आसन रचनेच्या ५५ आसनी तीन हजार बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आदिवासी भागात मिनी बसेसही आणणार
आदिवासी पाडा तिथे एसटी नऊ मीटर लांबीच्या, ३५ आसनी १०० अत्याधुनिक मिनी बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणल्या जाणार आहे. या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे नामकरण केले जाणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित असल्याची माहिती देण्यात आली.
अनेक पाड्यांत मोठ्या गाड्या पोहोचणे अशक्य
अनेक पाड्यामध्ये मोठ्या बसेसना प्रवेश शक्य नाही. मिनी बसेसमुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची होणारी पायपीट थांबणार आहे.
हेदेखील वाचा : St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा