
फोटो सौजन्य - Social Media
या निमित्ताने संस्थेच्या ९० वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेणारा विशेष माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला. “लोक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नसतील, तर शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवू” या संस्थेच्या ब्रीदवाक्याचा अर्थ या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आला. गोठ्यातून सुरू झालेली ही संस्था आज ठाणे, मुंबईपासून लंडनपर्यंत आपले कार्यक्षेत्र वाढवत दर्जेदार शिक्षण देत आहे. समाजकारणातील योगदान, सांस्कृतिक उपक्रम आणि शिक्षणविस्तारातील सातत्यपूर्ण भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडली.
कार्यक्रमाचा सांस्कृतिक भाग अविस्मरणीय ठरला. प्रख्यात गायक ओंकार दादरकर यांनी तबला वादक रोहित देव, हार्मोनियम वादक अनंत जोशी आणि पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांच्या साथीने राग शंकरमधील तीन बंदिशी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर पंडित राकेश चौरसिया यांच्या बासरीचे मधुर सूर आणि पंडित मुकुंदराज देव यांच्या तबल्याच्या तालांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. संपूर्ण कार्यक्रमात शास्त्रीय संगीताची मोहिनी पसरली होती.
वीपीएमच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उत्साहात उपस्थित राहिले. जवळपास १००० पेक्षा अधिक प्रेक्षकांच्या गर्दीने कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली. यावेळी संस्थेच्या विविध महाविद्यालयांना भेट दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे छायाचित्रण दृश्य माध्यमातून सादर केले गेले, ज्यामुळे अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
शिक्षण क्षेत्रातील संस्थेची वाढही तितकीच उल्लेखनीय आहे. ठाण्यातील कला, विज्ञान, वाणिज्य, मॅनेजमेंट, कायदा, अभियांत्रिकी, पॉलीटेक्निक महाविद्यालयांपासून ते लंडन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चपर्यंत व कोकणातील महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपर्यंत संस्था सातत्याने विस्तारत आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांच्या जाळ्यातून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे. आज संस्थेत सुमारे १७,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयातील “अतुल्य इनक्लुसिव्ह सेल” हा विशेष उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्य, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देत समावेशक शिक्षणाचा आदर्श निर्माण करतो.
१९३५ मध्ये सुरु झालेल्या विद्या प्रसारक मंडळाच्या या नऊ दशकांच्या प्रवासाचे स्मरण करणारा हा सोहळा शिक्षण, संस्कृती आणि कलाविष्कारांचा सुंदर संगम ठरला. पुढील काळातही अशाच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत राहण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन डॉ. महेश बेडेकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त केले. संस्थेचा “शिक्षणाचा दीप सर्वांपर्यंत” पोहोचवण्याचा संकल्प भविष्यातही तितक्याच दृढतेने पुढे नेला जाईल, असा विश्वास या कार्यक्रमातून दृग्गोचर झाला.