
फोटो सौजन्य - Social Media
रिसोड तालुक्यातील भरजहागीर येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (MKCL) अंतर्गत अमोल इन्फोटेक कॉम्प्युटर क्लासच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence – AI) या विषयावर आधारित मार्गदर्शनात्मक कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व सातत्याने वाढत असून शिक्षण, आरोग्य, उद्योग, मीडिया, संशोधन तसेच दैनंदिन जीवनात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी परिचित करून देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शक रवींद्र सोळंके यांनी विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती सविस्तरपणे समजावून सांगितली. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, ती कशी कार्य करते, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन यांसारख्या संकल्पनांचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो, याबाबत त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर करून अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी कशी बनवता येईल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी विद्यार्थ्यांना एआयशी संबंधित भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबतही माहिती देण्यात आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअर, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग एक्स्पर्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, रिसर्चर यांसारख्या करिअर पर्यायांबाबत मार्गदर्शन करताना आवश्यक कौशल्ये, अभ्यासक्रम आणि पुढील शैक्षणिक वाटचालीविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेला शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समर्पक उत्तरे दिल्याने कार्यक्रम अधिक संवादात्मक ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून आले.
या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य बी. जी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अशा प्रकारच्या तांत्रिक व करिअर मार्गदर्शनात्मक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.