फोटो सौजन्य- iStock
काही वर्षात वारेमाप सुरू झालेली वृक्षतोड यामुळे धनेश ( Hornbill) पक्षाची खाद्यफळे असणारे ५० ते ६० वर्षापूर्वीचे वृक्ष नामशेष झाले. याच कारणास्तव धनेश पक्षाच्या प्रजातीही धोकादायक आल्या. अशा स्थितीत धनेशचे संवर्धन होण्यासह त्याची खाद्यफळे असणाऱ्या रोपांची निर्मिती व्हावी, यासाठी धनेश मित्र संवर्धन मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येथील डीबीजे महाविद्यालयात रोपवाटिका सुरु केल्याची माहिती मंडळाचे प्रतिक मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण तालुक्यातील गावात धनेश पक्षाची घरटी असल्यास याची माहिती मंडळांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चार प्रजाती, वृक्षांची कमतरता
ते पुढे म्हणाले की, कोकणात धनेश पक्षांच्या चार प्रजाती आढळून येतात. महा धनेश, कवड्या धनेश, मलबारी राखी धनेश आणि भारतीय राखी धनेश या प्रजाती चिपळूण – तालुक्यातही आढळून येतात. काही वर्षात परिसरात झालेली वारेमाप वृक्षतोड त्यामुळे धनेश पक्षाच्या ढोली असणाऱ्या मोठ्या पुराण वृक्षांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे पुराण वृक्षांवर असणारी धनेश पक्षांची काजरा, लीम्बारा, वड, पिंपळ, उंबर, पायर, पिंपरी यासारखी खाद्यफळे कमी झाली. शिवाय तापमानातही वाढ झाल्याने धनेश प्रजाती धोकादायक बनल्या आहेत. जागतिक पातळीवरही धनेश प्रजातींचा अधिवास जवळजवळ २६ टक्क्याने घटला आहे.
धनेश संवर्धन उपक्रम
कोकणात खासगी मालकीच्या जंगलाची तोड, महामार्गाचा विस्तार अशा अनेक कारणांनी होत असलेली वृक्षतोड धनेश प्रजातींच्या मुळावर उठली आहे. धनेश प्रजातींवर झालेल्या अभ्यासात सह्याद्रीच्या उतारावरील जंगलांना नसलेले संरक्षण व तापमान वाढ यामुळे धनेश प्रजातींची संख्या वाढत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी देवरुख येथील सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धनेश मित्रांनी एकत्रित येऊन स्थापन झालेल्या धनेश मित्र निसर्ग मंडळ याबरोबरच एन.सी.एफ या संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनेश संवर्धन उपक्रम हाती घेण्यात आला. चिपळूण येथेही धनेश प्रजातींचे संवर्धन व्हावे, यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून डीबीजे महाविद्यालयात धनेश पक्षी खाद्यवृक्ष रोपवाटिका निर्मिती सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये चिपळुणात धनेश पक्षांच्या ढोली खालून गोळा करण्यात येणाऱ्या वृक्षांच्या बिया या रोपवाटिकेमध्ये नेऊन त्यापासून धनेश पक्षासाठी असणारी खाद्य वृक्षांची रोपे तयार केली जाणार आहेत. त्याची लागवड धनेशच्या अधिवास ठिकाणी केली जाणार आहे. डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व संस्थेतील सदस्यांच्या माध्यमातून बीज संकलन, ढोली निरीक्षण आणि रोपांचे संगोपन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
त्यासाठी चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव, बापट, संचालक नयनीश गुढेकर, डॉ. एच. टी बाबर, पक्षीमित्र नितीन नार्वेकर, सचिन पालकर, समीर कोवळे, शहानवाज शहा, ऋषिकेश पाळंदे, बंधू कदम, दिगंबर सुर्वे, गजानन सुर्वे तसेच सह्याद्री निसर्ग मित्रचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, तालुक्यातील गावामध्ये धनेश पक्षाची घरटी आढळल्यास त्याची माहिती मंडळाना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.