तरुण पिढीसमोर रोजगार हा सध्या महत्वाचा असा प्रश्न आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘जीजेएस – इंडिया जेम अँड ज्वेलरी शो 2025′ चे उदघाटन संपन्न झाले.’जीजेएस – इंडिया जेम अँड ज्वेलरी शो 2025’ हे केवळ प्रदर्शन नसून या माध्यमातून व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. व्यापाराच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सोनं हा देखील महत्वाचा भाग आहे.
आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. हजारो वर्षांपूर्वी देखील रत्न आणि दागिन्यांचे महत्त्व तेवढेच होते जेवढे आज आहे. रत्ने आणि दागिन्यांची परंपरा ही सुमारे 10,000 वर्षांपूर्वीची असून या परंपरेला संपूर्ण जगात पसरवण्याचे काम आपल्याच संस्कृतीने केले. या परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याचे काम जेम अँड ज्वेलरी काऊन्सिलच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी असंही सांगितलं.
जेम अँड ज्वेलरी काऊन्सिलने या क्षेत्रात केलेले कार्य महत्त्वाचे असून हे क्षेत्र हळूहळू आता संघटित होत आहे. आगामी काळात या क्षेत्रात नवोन्मेष आणण्याकरिता काऊन्सिल सरकार सोबतही काम करू शकते. व्यवसाय करण्यासाठी आजची परिस्थिती लक्षात घेऊन मानव संसाधनं तयार करण्याची जबाबदारी काऊन्सिलची असून यामध्ये शासन ही आपल्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
शिक्षणसंस्था, स्किल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत जेम अँड ज्वेलरी काऊन्सिलने एक समिती स्थापन करून या संदर्भात विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार करावा. काऊन्सिलसाठी महापे, नवी मुंबई येथे देशातील सर्वात आधुनिक जेम अँड ज्वेलरी पार्क उभे करण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते.