फोटो सौजन्य - Social Media
एका छोट्या गावातून आलेल्या केवळ 23 वर्षीय तरुणाची कहाणी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हा तरुण आपल्या कुटुंबातील पहिलाच असा विद्यार्थी होता ज्याने बीटेक (सीएसई) पूर्ण केले. कुटुंबासाठी हीच मोठी गोष्ट होती कारण घरची पार्श्वभूमी साधी असून उच्च शिक्षण घेणे कठीण काम होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका मोठ्या एमएनसी कंपनीत 3.6 लाख रुपयांचा वार्षिक पगार असलेली नोकरी मिळाली. मात्र या नोकरीसाठी जॉइनिंग होण्यास आठ महिन्यांचा अवधी होता. हा काळ वाया घालवण्याऐवजी त्याने स्वतःला काहीतरी मोठं करण्यासाठी झोकून दिलं.
त्याने परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये रिमोट जॉबसाठी अर्ज करायला सुरुवात केली. सात-आठ महिन्यांच्या कालावधीत त्याने तब्बल 500 ते 600 अर्ज केले, पण प्रत्येक वेळी त्याला नकारच मिळाला. सतत अपयश मिळत असूनही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अर्ज वेगळा बनवला, कव्हर लेटरमध्ये बदल केले आणि आपली मेहनत सुरूच ठेवली. त्याचं म्हणणं आहे की हे अर्ज कॉपी-पेस्ट नव्हते, तर प्रत्येक अर्ज तो स्वतःसाठी खास तयार करायचा. शेवटी त्याची मेहनत फळाला आली आणि त्याची निवड ओपनएआयच्या एका प्रोजेक्टसाठी झाली. या प्रोजेक्टअंतर्गत त्याला महिन्याला तब्बल 20 लाख रुपयांचा पॅकेज मिळाले.
या प्रोजेक्टदरम्यान त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. दिवसाला फक्त चार-पाच तास झोप घेऊन उर्वरित वेळ शिकणे आणि काम करण्यासाठी खर्च केला. त्याने सोशल लाइफ पूर्णपणे बाजूला ठेवली आणि प्रोजेक्टमध्ये आपलं सर्वस्व ओतलं. प्रोजेक्टची मुदत जरी फक्त ऑगस्टपर्यंत असली तरी या काळात त्याने मिळवलेलं यश विलक्षण होतं. 3.6 लाख वार्षिक पगारावरून थेट महिन्याला 20 लाखांपर्यंत पोहोचणं हे केवळ मेहनत, सातत्य आणि नशिबाची थोडी साथ यामुळे शक्य झालं असं त्याचं म्हणणं आहे.
आपली ही यशोगाथा त्याने सोशल मीडियावर रेडिट प्लॅटफॉर्मवर शेअर केली. त्याचं म्हणणं आहे की, टियर-3 शहरं किंवा ग्रामीण पार्श्वभूमी असली तरी, जर तुमच्याकडे कौशल्य आणि इंटरनेटची साथ असेल तर भूगोल अडथळा ठरत नाही. रिमोट वर्क हा एक मोठा बदल आहे ज्यामुळे जगभरातल्या संधी तुमच्यापर्यंत येऊ शकतात. त्याने पोस्टसोबत 20 लाखांहून अधिक रकमेची ट्रान्झॅक्शन स्लिप शेअर केली आहे. आता तो स्वतःची टेक कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहे.
अर्थातच या पोस्टची अधिकृत पुष्टी झालेली नाही कारण त्याने ऑफर लेटर किंवा अधिकृत कागदपत्रं दाखवलेली नाहीत. मात्र अशा संघर्षातून आलेली यशोगाथा तरुणांना हार न मानता सतत प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारी आहे. त्याची कथा हेच दाखवते की सतत अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नयेत, कारण कदाचित पुढच्याच संधीमध्ये तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल.