फोटो सौजन्य - Social Media
तैवानी तंत्रज्ञान कंपनी एसुस आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड अॅडल्ट्स (VIDYA) यांनी मिळून पश्चिम भारतातील वंचित विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता आणि कौशल्य विकासासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाचा थेट परिणाम ६,१३० मुला-मुलींवर आणि तरुणांवर होणार आहे. यासोबतच २,००० पेक्षा अधिक समुदायातील सदस्यांना अप्रत्यक्षपणे लाभ होणार असून, भविष्यासाठी तयार पिढी घडवण्यासाठी एक इकोसिस्टम दृष्टिकोन स्वीकारला जाणार आहे.
या उपक्रमाचा पहिला टप्पा मुंबईत सुरू होणार असून नंतर गोवा आणि गुजरातमध्ये विस्तार केला जाईल. पहिली ते दहावीतील ५,४८० विद्यार्थी आणि ६५० तरुणांना या कार्यक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. हे सर्व शिक्षण युनेस्कोच्या डिजिटल साक्षरता फ्रेमवर्कनुसार डिझाइन केलेल्या अभ्यासक्रमाद्वारे दिले जाणार असून, त्यामध्ये संगणक मूलतत्त्वे, डिजिटल कथाकथन, पोस्टर डिझाइन, स्क्रॅच व पायथॉन प्रोग्रामिंग, तसेच डिजिटल नीतिमत्तेची ओळख दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमात सर्जनशीलता, सहकार्य, आणि स्वयं-अभ्यास यावर भर दिला जाणार आहे.
तरुणांसाठी, या उपक्रमाद्वारे NIIT Foundation, NASSCOM FutureSkills Prime आणि Skill India Mission यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने प्रमाणित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये इंग्रजी संप्रेषण, करिअर मार्गदर्शन, नोकरी-तयारी आणि शिक्षणातून रोजगाराकडे संक्रमण यासारखी पूरक तत्त्वेही समाविष्ट आहेत. याशिवाय इंटर्नशिप, प्लेसमेंट प्रशिक्षण व प्रत्यक्ष नोकरी संधी यांद्वारे व्यावसायिक प्रगतीचा मार्गही खुला केला जाईल.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी एसुस इंडियाचे कंट्री हेड एरिक ओयू म्हणाले की, “या उपक्रमामुळे आम्ही वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करत आहोत.” तर विद्याच्या संस्थापक अध्यक्षा रश्मी मिश्रा म्हणाल्या, “हा उपक्रम फक्त डिजिटल शिक्षणाबाबत नाही, तर आशा, संधी आणि सक्षमीकरणाबाबत आहे.” एसुस आणि विद्या यांची ही भागीदारी देशातील डिजिटल दरी भरून काढण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.