
फोटो सौजन्य - Social Media
खूप सारे पैसे कमवण्याची इच्छा आहे. पण कशात करिअर करावे कळत नाही. आता टुरिझमचा ट्रेंड आहे. लोकांना फिरायला आवडतं. तुम्ही ही फक्त फिरून पैसे कमवू शकता. अनेक Youtuber हे करिअर क्षेत्रात एंट्री घेऊन महिन्याला लाखो छापत आहेत. तुम्हालाही असे पैसे कमवायचे असतील तर वाचा.
पर्यटन क्षेत्र हे केवळ फिरण्यापुरते मर्यादित न राहता आज रोजगारनिर्मितीचे मोठे साधन बनले आहे. देश-विदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी येणारा काळ अत्यंत आशादायी मानला जात आहे.
पात्रता निकष काय?
ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे. बारावीनंतर विद्यार्थी पर्यटन प्रशासनात बीए किंवा बीबीए करू शकतात. तसेच पुढे जाऊन प्रवास आणि पर्यटन विषयात एमबीए सारखी पदव्युत्तर पदवी घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना दीर्घकालीन पदवी अभ्यासक्रम नको आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत. त्यामुळे आवड, वेळ आणि आर्थिक परिस्थितीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा या क्षेत्रात मिळते.
अनेक पर्याय, विविध संधी
पर्यटन उद्योगाचा विस्तार वेगाने होत असल्याने या क्षेत्रात नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ट्रॅव्हल एजन्सी, सरकारी पर्यटन विभाग, हॉटेल उद्योग, टूर ऑपरेशन कंपन्या, एअरलाईन्स, इमिग्रेशन आणि कस्टम सर्व्हिसेस अशा विविध ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. देशांतर्गत पर्यटनासोबतच आंतरराष्ट्रीय पर्यटनालाही मागणी वाढत असल्याने बहुभाषिक आणि कुशल मनुष्यबळाची गरज भासते.
सर्टिफिकेट कोर्सेस आणि उच्च शिक्षण
डिग्री किंवा डिप्लोमा व्यतिरिक्त ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात अनेक सर्टिफिकेट कोर्सेसही करता येतात. या कोर्सेसमुळे विशिष्ट कौशल्ये आत्मसात करता येतात आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. संशोधन क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडी करण्याचाही पर्याय आहे. ही पीएचडी कोणत्याही सरकारी किंवा खासगी संस्थेतून करता येते. त्यासाठी संबंधित संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.
यशासाठी आवश्यक कौशल्ये
ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीमध्ये यशस्वी करिअर घडवण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसते. चांगले संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, समस्यांवर त्वरित उपाय शोधण्याची क्षमता आणि विविध संस्कृतींबद्दलची समज ही कौशल्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात.
प्रमुख संस्था
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी;
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, नवी दिल्ली;
क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बंगळुरू;
एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम, नोएडा;
जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली;
लखनऊ युनिव्हर्सिटी, लखनौ.
नोकरीच्या संधी (जॉब प्रोफाइल्स)
या क्षेत्रात ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल एक्झिक्युटिव्ह, ट्रॅव्हल ऑफिसर, टूरिस्ट गाईड, ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ट्रॅव्हल रायटर, ग्राउंड स्टाफ, ट्रॅव्हल काउन्सिलर तसेच ट्रान्सलेटर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते.
एकूणच, आवड, कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात यशस्वी आणि समाधानकारक करिअर नक्कीच घडवता येऊ शकते.