
CDOE Admissions : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
नीता परब/मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai Univercity) दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (CDOE Admissions) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क, युजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईचे प्रमुख उद्देश आहेत.
बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम ( कॉमर्स, अकाऊटंसी आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.
एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) व डिप्लोमा इन स्कूल मैनेजमेंट (डीएसएम) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविले जात आहेत. दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण केली अशा विद्यार्थ्यांना शूल्क अदा करण्यासाठी सीडीओई मार्फत ऑनलाईन पेमेंट लिंक पाठवली जात असून विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत शूल्क अदा करून प्रवेश निश्चित करता येईल. ऑनलाईन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सीडीओईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात मागील शैक्षणिक वर्षापासून एम. ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आला आहे. तर या शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा किमान पात्रता धारक विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून दिली जात आहे. सीडीओईची चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी आणि पालघर येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत प्रवेश प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.