फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) मध्ये कन्सल्टंट (लँडस्केप आर्किटेक्चर) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरती अंतर्गत एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार असून, आवश्यकतेनुसार आणि समाधानकारक कामगिरीनंतर कालावधी वाढवला जाऊ शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे 2025 आहे आणि या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उमेदवारांकडे आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी आणि लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स डिग्री किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मास्टर्सनंतर लँडस्केप प्रोजेक्ट्समध्ये व्यावसायिक अनुभव असावा. AutoCAD, Adobe Creative Suite, 3D Development Software, MS Office यांसारख्या सॉफ्टवेअर्सचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 मे 2025 रोजी 45 वर्षांपेक्षा अधिक नसावे. वेतन उमेदवाराच्या अनुभवावर आधारित निश्चित करण्यात येणार आहे. 5 ते 10 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना दरमहा ₹76,000 आणि ₹3,000 प्रवास भत्ता मिळेल, तर 5 वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेल्या उमेदवारांना दरमहा ₹52,500 आणि ₹1,500 प्रवास भत्ता दिला जाईल.
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम दिल्ली विकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.dda.gov.in) भेट द्यावी. तेथे दिलेल्या भरतीविषयक सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे बारकाईने वाचन करून, त्यानुसार अर्ज डाउनलोड करावा. हा अर्ज पूर्णपणे भरून, आवश्यक ती माहिती नीट तपासून, स्कॅन करून तो consultant.rc@dda.org.in या अधिकृत ई-मेल पत्त्यावर निर्धारित मुदतीच्या आत पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवताना उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे संलग्न करण्याची आवश्यकता नाही. तथापि, निवड प्रक्रिया दरम्यान, विशेषतः मुलाखतीच्या वेळी, सर्व मूळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. अर्ज करताना कोणतीही माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरून, वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. भरतीसंबंधी अधिक माहिती, बदल किंवा अपडेट्स जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी DDA च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत राहावे.