
फोटो सौजन्य - Social Media
आजकाल २५ ते ३० वयोगटातील अनेक तरुण सतत थकवा जाणवत असल्याची तक्रार करत आहेत. हा थकवा फक्त शरीरापुरता मर्यादित नसून तो मनावरही परिणाम करतो. करिअरच्या सुरुवातीलाच मोठं काहीतरी मिळवण्याची घाई, सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव आणि कामाशी कायम जोडलेले राहण्याची सवय यामुळे अनेक जण नकळत ‘बर्नआउट’च्या दिशेने जात आहेत. बर्नआउट म्हणजे कामाबद्दलचा उत्साह संपणे, चिडचिड होणे आणि मानसिकदृष्ट्या रिकामेपणा जाणवणे.
जर तुम्हाला सोमवारची सकाळ जड वाटत असेल, ऑफिसचा विचार करताच अस्वस्थता येत असेल किंवा अगदी छोट्या गोष्टींवर राग येत असेल, तर ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. आपण अशा काळात जगतो आहोत जिथे सतत ‘बिझी’ असणं म्हणजेच यश असं समजलं जातं. पण सतत न थांबता धावल्यास करिअरची आयुष्यरेषा लवकर संपण्याची शक्यता असते. वयाच्या ३० वर्षांपूर्वीच बर्नआउट झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण भविष्यातील कामकाजावर होऊ शकतो. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, काही छोट्या सवयी बदलल्या तर बर्नआउट टाळता येऊ शकतो.
वर्क-लाईफ बॅलन्स जपा
ऑफिसचे काम ठराविक वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काम संपल्यानंतर लॅपटॉप बंद करा आणि स्वतःसाठी वेळ ठेवा. घरी पोहोचल्यानंतर ऑफिसचे ईमेल आणि वर्क ग्रुप्सचे नोटिफिकेशन बंद ठेवण्याची सवय लावा. सहकाऱ्यांना नम्रपणे सांगा की ऑफिसच्या वेळेनंतर तुम्ही उपलब्ध नसता.
‘हसल कल्चर’च्या दबावात येऊ नका
करिअर ही एक लांब पल्ल्याची शर्यत आहे, ती स्प्रिंट नाही. सोशल मीडियावर दिसणाऱ्या इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. तिथे दिसणारं यश अनेकदा वास्तव नसतं. आराम करणे म्हणजे आळस नाही, तर स्वतःला पुन्हा उर्जित करण्याची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा.
छोटे ब्रेक घ्या
सतत काम करत बसण्यापेक्षा दर ४५–५० मिनिटांनंतर ५–१० मिनिटांचा ब्रेक घ्या. थोडं चालणं, पाणी पिणं किंवा खिडकीतून बाहेर पाहणंही मनाला शांत करतं. जेवणाच्या वेळेत काम टाळा. आठवड्यातून किमान एक दिवस पूर्णपणे कामापासून दूर राहा.
प्राधान्यक्रम ठरवा
दररोज सकाळी फक्त २–३ महत्त्वाची कामे ठरवा. सर्व काही एकाच दिवशी करायचा अट्टहास नको. गरज असेल तेव्हा ‘नाही’ म्हणायला शिका. जास्त काम नाकारणं ही कमजोरी नसून स्वतःची मर्यादा ओळखणं आहे.
छंद आणि आरोग्याला वेळ द्या
तुम्हाला आनंद देणारा छंद जोपासा, गाणं, वाचन, खेळ, स्वयंपाक काहीही असो. नियमित व्यायाम केल्याने ताण कमी होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज किमान ७–८ तास शांत झोप घ्या. चांगली झोप ही मेंदूसाठी सर्वोत्तम औषध आहे. करिअरमध्ये यश मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच मानसिक आरोग्य जपणंही गरजेचं आहे. स्वतःला थांबवणं, श्वास घेणं आणि आयुष्याचा समतोल राखणं हेच दीर्घकाळ यशस्वी राहण्याचं खरं गमक आहे.