फोटो सौजन्य - Social Media
स्वप्न म्हणजे केवळ डोळ्यांत साठवलेली इच्छा नाही, तर ते पूर्ण होईपर्यंत जपलेला हट्ट, केलेले त्याग आणि अखंड मेहनत होय. आयपीएस अधिकारी तृप्ती भट्ट यांची कहाणी हेच शिकवते की, ध्येय स्पष्ट असेल तर आकर्षक संधीसुद्धा मागे टाकाव्या लागतात. सरकारी नोकरीचं स्वप्न अनेकांचं असतं, पण तृप्ती भट्ट यांच्यासाठी एकच ध्येय ठरलेलं होतं, आयपीएस अधिकारी होणं. या ध्येयासाठी त्यांनी सुरक्षित, प्रतिष्ठित आणि उच्च पगाराच्या अनेक नोकऱ्यांना नकार दिला आणि अखेर आपलं स्वप्न साकार केलं.
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील तृप्ती भट्ट या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत. लहानपणापासूनच त्यांच्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. घरची परिस्थिती सामान्य असली तरी विचार मोठे होते. या प्रवासात त्यांना आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. “तू जे ठरवशील, त्यासाठी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,” हा विश्वासच त्यांच्या आत्मबळाचा पाया ठरला.
तृप्ती यांनी पंतनगर विद्यापीठातून बी.टेक (BTech) ही अभियांत्रिकी पदवी घेतली. अभ्यासात हुशार असल्याने शिक्षण पूर्ण होताच त्यांच्यासमोर अनेक नामांकित संस्थांमधून नोकरीच्या संधी चालून आल्या. त्यात देशाची प्रतिष्ठित संस्था असलेल्या इस्रो (ISRO) मधील नोकरीचाही समावेश होता. अनेकांसाठी इस्रोची नोकरी म्हणजे आयुष्याचं अंतिम ध्येय असतं. मात्र तृप्ती यांच्यासाठी ती केवळ एक संधी होती स्वप्न नव्हे.
इथेच त्यांच्या जिद्दीची खरी परीक्षा झाली. इस्रोसह एनटीपीसीमधील असिस्टंट मॅनेजर पदासारख्या एकूण १६ सरकारी नोकऱ्यांना त्यांनी नकार दिला. सुरक्षित भविष्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा असूनही त्यांनी या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या. कारण त्यांना केवळ नोकरी नको होती, तर आयपीएस अधिकारी म्हणून देशसेवा करायची होती.
सर्व नोकरीच्या ऑफर्स नाकारल्यानंतर त्यांनी पूर्णपणे यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेच्या तयारीला स्वतःला झोकून दिलं. हा काळ त्यांच्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. पण त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी २०१३ परीक्षेत यश मिळवलं. तृप्ती भट्ट यांनी ऑल इंडिया रँक १६५ मिळवली आणि त्यांचं आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्यांची ही यशोगाथा आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ध्येयावर अढळ विश्वास, कठोर परिश्रम आणि योग्य निर्णयक्षमता असेल, तर कोणतीही उंची गाठणं अशक्य नाही हेच तृप्ती भट्ट यांच्या जीवनातून शिकायला मिळतं.






