फोटो सौजन्य - Social Media
नवी मुंबईत विकसित होणारी ‘एज्यू सिटी’ ही प्रकल्प योजना परदेशी शिक्षणासाठी स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज 2025 परिषदेत सांगितले. यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (इंग्लंड) आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या दोन नामांकित परदेशी विद्यापीठांचे कॅंपस नवी मुंबईत उभारले जाणार असून प्रत्येकी 1500 कोटींचे सामंजस्य करार सिडकोमार्फत करण्यात आले आहेत.
या परिषदेमध्ये एकूण 8000 कोटी रुपयांचे विविध करार झाले असून यामध्ये चित्रपट निर्मिती क्षेत्रासाठी प्राईम फोकस कंपनीसोबत 3000 कोटी रुपये आणि गोदरेजसोबत 2000 कोटी रुपयांचे करार करण्यात आले. या प्रकल्पांमुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. प्राईम फोकस स्टुडिओ प्रकल्पामुळे सुमारे 2500 थेट रोजगार उपलब्ध होतील आणि तो 2025-26 मध्ये सुरू होईल. तर गोदरेजचा पनवेल प्रकल्प 2027 आणि 2030 पर्यंत दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. एकूण 2000 कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार या माध्यमातून अपेक्षित आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताचे नवीन शैक्षणिक धोरण हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी दरवाजे खुले करत आहे. त्यामुळे जागतिक विद्यापीठांचे भारतात स्वागत होत आहे आणि ही मोठी संधी विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मिळणार आहे. यासोबतच, गोदरेज व प्राईम फोकससारख्या नामांकित कंपन्यांशी झालेले करार फिल्म इंडस्ट्रीच्या दर्जात आणि रोजगार निर्मितीत वाढ करतील.
या वेळी NSE Indices Ltd. च्या ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’चा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाला. या इंडेक्समध्ये मीडिया, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील 43 कंपन्या समाविष्ट असून जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्याची शक्यता आहे. या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र शासनामार्फत पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. हे पाऊल महाराष्ट्राला शिक्षण, तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडीवर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.