फोटो सौजन्य - Social Media
कधी कधी काही व्यक्तींचा संघर्ष इतका मोठा असतो की तो इतरांसाठी प्रेरणादायक ठरतो. अशाच एका खंबीर विद्यार्थ्याची गोष्ट सध्या चर्चेत आहे. बेंगळुरूतील चिरंतन होन्नापुरा या मुलाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी सामना करत ICSE बोर्डाच्या दहावी परीक्षेत तब्बल ९२ टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या जिद्दीचा आणि मेहनतीचा सर्वत्र गौरव होत आहे.
चिरंतन आर्यन प्रेसीडेंसी स्कूल, नागरभावी येथील विद्यार्थी आहे. नववीत असताना त्याला हाय-ग्रेड ऑस्टिओसारकोमा या हाडांच्या कॅन्सरचे निदान झाले. हा कॅन्सर विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो आणि उपचारही अत्यंत कठीण असतात. ऑक्टोबरमध्ये आजार समोर आल्यानंतर त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. हातातून हाड काढून टाकण्यात आलं. यामुळे काही काळ त्याला शाळाही सोडावी लागली. मात्र या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही चिरंतनने हार मानली नाही.
नववीच्या परीक्षेसाठी त्याने सहायक लेखकाच्या मदतीने परीक्षा दिली आणि ८२ टक्के गुण मिळवले. दहावीतही त्याने कोणतीही ट्युशन लावली नाही. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, ऑनलाइन क्लासेस आणि स्वतःचा आत्मविश्वास यावर विश्वास ठेवत त्याने अभ्यास केला. तीन महिने कीमोथेरपीमुळे शाळेत जाता आलं नाही, पण त्याने सोशल मीडियावरून लेक्चर्स ऐकले आणि अभ्यासात खंड पडू दिला नाही.
चिरंतन सांगतो, “मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या शाळेची आणि मित्रांची खूप आठवण यायची. त्यांचाच आधार होता म्हणून मी या सगळ्या परिस्थितीतून बाहेर आलो.” तो पुढे म्हणतो, “मी क्लासमध्ये लक्ष देत असे, आणि जे शिकलो ते माझ्या भाषेत लिहून घेत असे. यामुळे समजायला आणि लक्षात ठेवायला सोपं गेलं.” सध्या चिरंतन कॉमर्स शाखेतून प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण घेत आहे. त्यानंतर तो कायद्याचं शिक्षण घेऊन UPSC परीक्षा देणार आहे. त्याचं स्वप्न आहे IPS अधिकारी बनण्याचं. “लहानपणापासून मला IPS व्हायचं होतं. मला समाजात काहीतरी चांगला बदल घडवायचा आहे,” असं तो ठामपणे सांगतो. चिरंतनसारख्या विद्यार्थ्यांकडून शिकण्यासारखं खूप आहे – संकट कितीही मोठं असो, मनात जिद्द असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते.