
फोटो सौजन्य - Social Media
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील विद्यार्थिनीची व्यथा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिक्षणासाठी मदतीची साद घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोहोचलेल्या या विद्यार्थिनीला मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. परिणामी, आपली व्यथा कुणीही ऐकून न घेतल्याची भावना मनात दाटून आल्याने तिला अश्रू अनावर झाले. बहरी येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या एका अधिकृत कार्यक्रमात ही विद्यार्थिनी हातात अर्ज घेऊन उपस्थित होती. शिक्षण आणि भविष्यासाठी मदत मिळावी, या एकमेव आशेने ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कडक सुरक्षा व्यवस्था आणि कार्यक्रमातील धावपळ यामुळे तिला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची संधी मिळाली नाही.
ही विद्यार्थिनी सीधी जिल्ह्यातील आदिवासीबहुल चिनगवाह गावाची रहिवासी असून ती ‘बैगा’ या आदिवासी समुदायातून येते. तिचं नाव अनामिका आहे. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या अनामिकाचं स्वप्न मात्र मोठं आहे. ती डॉक्टर होऊन समाजाची आणि देशाची सेवा करू इच्छिते. रडत रडत अनामिका म्हणाली, “मी गरीब आहे. पण माझं स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे. मला शिकायचं आहे, लोकांना उपचार द्यायचे आहेत. मात्र, माझ्या घरची परिस्थिती इतकी वाईट आहे की मेडिकल शिक्षणाचा खर्च आमच्यासाठी अशक्य आहे.”
अनामिकाचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवसाला मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून घरखर्च भागवणेही कठीण होत असल्याचे तिने सांगितले. अशा परिस्थितीत मेडिकलसारख्या महागड्या शिक्षणाचा विचार करणेही तिच्यासाठी स्वप्नवत ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही पहिलीच वेळ नाही की अनामिकाने मदतीची याचना केली आहे. यापूर्वीही तिने सीधी जिल्ह्यातील धौहनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. प्रत्येक वेळी आश्वासनं मिळाली, पण प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतीही ठोस आर्थिक मदत तिला मिळालेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात तरी आपली दखल घेतली जाईल, अशी तिला शेवटची आशा होती. मात्र तीही पूर्ण न झाल्याने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिचा हा आक्रोश सध्या समाजमाध्यमांवरही चर्चेचा विषय ठरत आहे. अनामिकाची ही कहाणी देशातील अनेक गरीब, हुशार विद्यार्थ्यांचे वास्तव चित्र उभे करते. क्षमता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणे, ही आजही मोठी सामाजिक समस्या आहे. अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने पुढे येण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.