फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांना शाळांमध्ये नियमित शिक्षणासोबतच व्यावहारिक आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. समग्र शिक्षा, पीएम श्री आणि स्टार्स अशा केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर दिला जातो, असे राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी सांगितले.
पुण्यात दोन दिवसांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात राज्यातील शिक्षण सहसंचालक, विभागीय उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी, तसेच इतर शैक्षणिक अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उपक्रमांची अंमलबजावणी कशी करावी यावर चर्चा करण्यात आली.
श्रीमती विमला यांनी सांगितले की, शासनाचे उद्दिष्ट सर्व विद्यार्थ्यांना समावेशक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळवून देणे आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. शाळाबाह्य मुलांना ओळखून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी वेगळ्या योजनांद्वारे प्रयत्न केले जात असून, त्यांना शिक्षणासाठी अनुकूल वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत. शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा, स्वच्छ आणि पुरेशी वर्गखोल्या, सुरक्षित स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय, शाळा विद्युतीकरण, तसेच इतर मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची खात्री करून विद्यार्थ्यांसाठी शाळा हे केवळ शिकण्याचेच नाही, तर त्यांच्यासाठी प्रेरणादायक आणि सुखद अनुभव देणारे स्थान बनावे, यावर शासनाचा भर आहे. शिक्षण हा केवळ पुस्तकी ज्ञानापर्यंत मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग कसा ठरतो, हे सुनिश्चित करणे हेही महत्वाचे आहे.
या कार्यशाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील प्रगतीचा आढावा घेतला गेला. 2024-25 मध्ये साध्य केलेल्या गोष्टी आणि 2025-26 साठी प्रस्तावित उपक्रमांवरही चर्चा झाली. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी शाळा विकास आराखड्याबाबत माहिती दिली आणि वार्षिक कार्ययोजना तयार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी शाळांच्या सामाजिक अंकेक्षणाची गरज आणि त्यासाठीची तयारी यावरही मार्गदर्शन झाले. शाळांच्या सुधारणा आणि शिक्षण दर्जा वाढवण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.