फोटो सौजन्य - Social Media
भारताने अलीकडेच रॉकेटसाठी स्वतःचा पहिला अंतराळ-स्तरीय संगणक चिप तयार केला आहे, ज्याला विक्रम-32 असे नाव देण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ तांत्रिक क्रांतीचं उदाहरण नाही तर देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील मोठ्या पावलाचं प्रतीकही आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहनं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक घटकाची पायाभरणी सेमीकंडक्टरवरच होते. त्यामुळे या क्षेत्रातील करिअर संधी अमर्याद आहेत.
‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ यांसारख्या सरकारी उपक्रमांमुळे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला नवसंजीवनी मिळाली आहे. एका अहवालानुसार २०२६ पर्यंत या उद्योगात सुमारे १० लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे. जागतिक पातळीवरील मागणी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा वाढता विस्तार आणि भारतातील संशोधन व उत्पादन क्षमता यामुळे हा योग्य काळ आहे की तरुणांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून वळावं.
या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, VLSI डिझाइनमध्ये बी.टेक/बी.ई. पूर्ण करून पुढे मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर फिजिक्स, एम्बेडेड सिस्टीम्समध्ये एम.टेक/एम.ई. करू शकता. संशोधनाची आवड असल्यास पीएचडीचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय VLSI डिझाइन, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, चिप डिझाइन, PCB डिझाइन, ASIC आणि FPGA यांसारख्या डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्सही करता येतात.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही भरपूर संधी उपलब्ध आहेत. NPTEL, Skill India (apprenticeshipindia.gov.in) आणि SWAYAM (swayam.gov.in) हे शॉर्ट टर्म कोर्स व अप्रेंटिस ट्रेनिंग प्रोग्राम ऑफर करतात. IIT व NIT सारखी नामांकित संस्थानं सहा महिने ते एक वर्ष कालावधीचे अॅडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस चालवतात. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रथम सेमीकंडक्टर उद्योगाची रचना समजून घेणं महत्त्वाचं आहे. डिझाइन, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि टेस्टिंग हे या प्रक्रियेचे मुख्य टप्पे आहेत. चिप डिझायनर व मॅन्युफॅक्चरर यांच्यातील फरक, CAD व VLSI डिझाइन टूल्सचे महत्त्व आणि फॅब्रिकेशन लॅबची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे.
करिअर घडवण्यासाठी इंटर्नशिप व प्रोजेक्ट वर्क हाही एक महत्त्वाचा टप्पा आहे. इसरो, DRDO, BEL आणि SCL यांसारख्या संस्था अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संशोधन व प्रशिक्षणाची संधी देतात. याशिवाय Intel India, Micron, Qualcomm, IIT/NIT मधील इलेक्ट्रॉनिक्स लॅब, तसेच C-DAC, SAMEER, IISc बेंगळुरू यांसारखी संस्थानंही इंटर्नशिप व प्रॅक्टिकल प्रोग्राम उपलब्ध करून देतात. म्हणूनच, सेमीकंडक्टर उद्योग हा केवळ तंत्रज्ञानाचा पाया नसून भविष्यातील रोजगाराचा सुवर्णद्वार ठरणार आहे. योग्य तयारी, कौशल्य व संशोधनाची आवड असल्यास या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवणं शक्य आहे.