फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि मराठी माणूस सुभाष सोनकांबळे यांनी लिहिलेल्या बहुचर्चित ’आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकाचे प्रकाशन जगातील शंभर देशांत होणार असून पहिले प्रकाशन सोनकांबळे हे लंडन येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात करणार आहेत.
या पुस्तकाच्या माध्यमातून सोनकांबळे नुकतेच भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडणार आहेत. पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीला किती घातक आहे, हे सांगणार आहेत. पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पाडणार आहेत.
यापूर्वी पाकिस्तानने भारतावर छुपे युद्ध लादत 26/11ला वेठीस धरले होते. मुंबईवर भ्याड हल्ला करून शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले होते. भारताची वाढती आर्थिक आणि सामाजिक प्रगती रोखू पाहणाऱ्या या भ्याड हल्ल्यावरही सोनकांबळे यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला किती घातक आहे हेही स्पष्ठ केले आहे. ’आय म्या पंतप्रधान पाह्यला’ हे सोनकांबळे यांचे ज्वलंत आत्मकथन आहे. त्यात जगातील संपूर्ण दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत कसा विश्वगुरु ठरेल, याचे विचार मांडले आहेत. 26/11 चा मुंबईवरील दहातवादी हल्ला आणि आताचा पहेलगामवरील हल्ल्याचे जळजळीत वास्तव देखील मांडले आहे. हे वास्तव आणि घटना जगातील सामान्य लोकांना दहशतवादाविरोधात विचार करायला आणि त्याविरोधात लढ्यात स्वयंप्रेरणेने सहभागी व्हायला, सांगणारे आहेत.
दरम्यान, पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी भारतच नव्हे तर जगाची प्रगती रोखण्यासाठी कोणत्या खालच्या थराला जावू शकतात, याचे चित्रही सोनकांबळे यांनी आपल्या ’आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकात रेखाटले आहे. त्यामुळे भारतच नव्हे तर संपूर्ण जगातील दहशतवाद संपविण्यासाठी ते मार्गदर्शक ठरत जगाला नवी दिशा दाखविणारे ठरणार आहे.