अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?
Ajit Pawar News: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडूनही जोमाने तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी नेते, पदाधिकारी स्वबळवर लढण्याची तयारी करत आहेत. पण महायुतीत जागावाटपावरून पुन्हा नवा वाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीला पहिला दणका देण्याची तयारी सुरू केली आहे. अजित पवार यांनी पुण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना काही महत्त्वाचे आदेश दिल्याची माहिती आहे.
राज्यातील मुंबई महापालिकेप्रमाणेच पुणे महानगरपालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवारांचे मोठे वर्चस्वही राहिले आहे. अजित पवारांसाठी पुणे महानगरपालिका प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे महापालिकेवर आपली सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार सातत्याने पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना देताना दिसत आहेत. अशाच एका बैठकीत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काही आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Maratha Reservation : राज्य सरकारने अखेर जीआर काढलाच; मराठा समाजाला आता ‘हा’ होणार मोठा फायदा
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. राज्यातील मुंबई आणि पुणे महापालिकांची नवी प्रभागरचना जारी करण्यात आली आहे. ही प्रभागरचना भाजप आणि शिंदे गटाला पुरक अशी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्याबाबत “आपण या प्रभागरचनेला आव्हान देण्यासाठी न्यायालयात जाणार नाहीत. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
पावसाचा हाहा:कार ! जम्मू-काश्मीरच्या रामबन येथे ढगफुटी; तिघांचा मृत्यू तर अनेकजण बेपत्ता
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून स्पर्धा करायची की स्वबळावर उतरायचे, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. बैठकीत बोलताना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सर्वच जागांसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीही कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित राहणार की अजितदादा स्वतंत्र वाटचाल करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.