फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड – मोखाडा: मोखाडा त्र्यंबकेश्वर मार्गांवर निळमाती ते चिंचूतारा दरम्यान रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. सदर खड्ड्याचा व्यास इतका मोठा आहे की त्याने संपूर्ण रस्ताच काबीज केलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टीला जागाच नाही त्यामुळे या मार्गांवरून धावणाऱ्या वाहणांना खड्ड्यातूनच वाट काढावी लागत आहे. सदर ठिकाणी अरुंद रस्ता असल्यामुळे वाहणांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायाने येथे अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम उपविभाग त्याकडे सोईस्करपने दुर्लक्ष करत आहे.
मोखाडा तालुक्यातील बहुतांश राज्यमार्गाची चाळण झालेली आहे मालिदांच्या कामाकडे जाणीवपूर्वक पाहणारे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र खड्ड्यांच्या माध्यमातून डोकावणारी लाज उघड्या डोळ्याने पाहत असल्याने यंदा गणरायांचे आगमनही खड्ड्यातूनच झालेले आहे. मोखाडा, खोडाळा, विहिगाव आणि मनोर, वाडा, देवगाव या रस्त्यावरील खड्डे आजही ठिकठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. मनोर, वाडा, देवगाव हा रस्ता संबंधित ठेकेदाराच्या दुरुस्तीत असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाची तितकीच जबाबदारी असून देखील प्रवाशांच्या योगक्षेमाची म्हणावी तितकी काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली जात नाही.
मोखाडा, खोडाळा राज्य मार्गांवर डोल्हारा ते देवबांध दरम्यान निकृष्ट संरक्षण भिंती खचून गेल्यामुळे भुसभूशीत झालेला रस्ता अर्धाअधिक तुटत आलेला आहे. हिच परिस्तिथी मनोर, वाडा, देवगाव रस्त्यावर खोडाळा ते वाघ्याचिवाडी दरम्यान ऐन वळणावर उद्भवलेले आहे याबाबत ओरड झाल्यानंतर बेफिकीर सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायका मार्गाचे अवलोकन होण्यासाठी जुजबी उपाय योजना केली होती. सदरचे दोन्हीही राज्य मार्ग हे वर्दळीचे असून या ठिकाणावरून अवजड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. नव्याने या धोकादायका ठिकाणावरून वाहतूक करणाऱ्या नवागतांच्या लक्षात येणार नाही अशी परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्वच धोकादायक ठिकाणी वाहणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.