फोटो सौजन्य - Social Media
भारतीय हवाई दलात (IAF) ग्रुप C सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 153 पदांसाठी ही भरती केली जाणार असून, रोजगार समाचाराच्या 17 ते 23 मे 2025 च्या अंकात याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ही संधी मिळवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. या भरतीअंतर्गत विविध पदांसाठी पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे. मात्र सर्वसाधारणपणे उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादा मोजताना शेवटचा अर्ज पोहोचण्याचा दिवस लक्षात घेतला जाणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
भरती प्रक्रियेचा विचार केला तर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाणार आहे. विविध पदांसाठी परीक्षेचा नमुना थोडासा वेगळा राहील. एलडीसी, हिंदी टायपिस्ट, एमटीएस, मेस स्टाफ, लॉंड्रीमन, हाउस कीपिंग स्टाफ यांसाठी सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी, अंकगणित आणि सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातील. इतर तांत्रिक पदांसाठी त्यासोबत संबंधित विषयांवर आधारित प्रश्नही विचारले जातील.
या भरतीअंतर्गत एलडीसीसाठी 10 पदे, हिंदी टायपिस्टसाठी 1 पद, कुकसाठी 12, स्टोअर कीपरसाठी 16, सुतार आणि पेंटरसाठी प्रत्येकी 3 पदे, एमटीएससाठी 53, मेस स्टाफसाठी 7, लॉंड्रीमनसाठी 3, हाउस कीपिंग स्टाफसाठी 31, वल्कनायझरसाठी 1 आणि ड्रायव्हरसाठी 8 पदांची भरती होणार आहे. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
काही पदांसाठी संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याची प्रक्रिया ऑफलाईन आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत जाहिरात वाचून आवश्यक कागदपत्रांची तयारी करावी. त्यानंतर अर्ज भरून सर्व कागदपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवावा. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी असून इच्छुकांनी ती नक्कीच साधावी.