फोटो सौजन्य - Social Media
चंबळच्या खोर्यातून आलेल्या देव यांचा जन्म एका अशा कुटुंबात झाला, जिथे संघर्ष, बदनामी आणि समाजाचा तिरस्कार यांचा वारसा होता. कारण, त्यांच्या आजोबांची ओळख कधी काळी चंबळमधील डाकू म्हणून होती. त्यामुळे लहानपणापासूनच देवला “डाकूचा नातू” म्हणून हिणवलं जात होतं. पण त्यांनी हे ठरवलं होतं की, आपली ओळख आजोबांच्या भूतकाळावरून नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वावरून करायची आहे.
देवने शिक्षणात नेहमीच उत्कृष्टता दाखवली. IITमध्ये प्रवेश मिळवून तेथे उच्च शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी नेदरलँड्समधील प्रसिद्ध कंपनी ‘फिलिप्स’मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू केलं. तिथे त्यांचा वार्षिक पगार होता जवळपास ८८ लाख रुपये. कोणालाही थक्क करेल असा तो करिअर होता. पण देवचं स्वप्न वेगळंच होतं – देशसेवा. त्यामुळे त्यांनी उच्चपदस्थ नोकरीचा राजीनामा देऊन UPSCची वाट धरली.
UPSCचा प्रवास देवसाठी काही सोपा नव्हता. त्यांनी सहा वेळा प्रयत्न केले. चार वेळा मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचले, तीन वेळा इंटरव्ह्यू दिले, पण दरवेळी अपयश आलं. तरीही त्यांनी हार मानली नाही. सातव्या प्रयत्नात, 2025 च्या UPSC परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय 629वी रँक मिळवली. या यशामध्ये केवळ नंबर नाही, तर त्यांचा संघर्ष, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीचा विजय सामावलेला आहे.
आज देव IAS अधिकारी झाले असून त्यांची ओळख समाजात बदल घडवणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्ती म्हणून होत आहे. त्यांनी सिद्ध केलं की कोणत्याही पार्श्वभूमीचा माणूस जर खरे प्रयत्न करत असेल, तर तो स्वतःचं भविष्य घडवू शकतो. त्यांच्या यशाने हेही दाखवून दिलं की अतीत कितीही गडद असो, भविष्य उज्वल बनवता येतं – गरज आहे फक्त ध्येयावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहण्याची. देव तोमर यांची कहाणी आजच्या तरुणांसाठी एक प्रकाशवाट आहे. ज्यांचं बालपण संघर्षात गेलंय, ज्यांना समाजानं कमी लेखलंय – त्यांच्यासाठी ही गोष्ट उमेद देते. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतंही स्वप्न साकार करता येतं, हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं आहे