फोटो सौजन्य - Social Media
हरियाणामधल्या एका छोट्याशा गावात जन्मलेला प्रदीप सिंह हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा. त्याचे वडील सुखबीर सिंह सोनीपत येथील पेट्रोल पंपावर नोकरी करत होते. घरात फारसे उत्पन्न नव्हते, दिवसेंदिवस आर्थिक अडचणी वाढत होत्या. पण तरीही वडिलांनी प्रदीपच्या शिक्षणात कधीच तडजोड केली नाही. त्यांना एकच स्वप्न होतं “माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा!” प्रदीपने शालेय शिक्षण गावातून पूर्ण केलं आणि नंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीकॉम (ऑनर्स) केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी इन्कम टॅक्स विभागात इंस्पेक्टर म्हणूनही काम केलं. पण मनात सतत IAS बनण्याचं स्वप्न धगधगत होतं. शेवटी त्याने ठरवलं, आता नोकरी नको, आयुष्यभरासाठी एक मोठी उडी घ्यायची आहे!
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रदीपला दिल्लीला जायचं होतं. पण तेवढा खर्च करायची परिस्थिती नव्हती. तेव्हा वडिलांनी एक कठीण पण धाडसी निर्णय घेतला, घर विकून मुलाच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्याचा! त्यांनी आपलं हक्काचं घर विकलं, आणि त्या पैशातून प्रदीपला दिल्लीला पाठवलं. प्रदीपने आपल्या वडिलांनी केलेला बलिदान व्यर्थ जाऊ दिला नाही. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात, कुठलाही पाठिंबा नसताना, त्याने दिवस आणि रात्र एक करून अभ्यास केला. मित्रमैत्रिणी, सोशल मीडियाचे आकर्षण, बाहेर फिरण्याचे प्रलोभन या सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवत त्याने स्वतःला फक्त एका ध्येयासाठी झोकून दिलं. त्याच्या मनात एकच गोष्ट होती “माझ्या वडिलांनी घर विकलंय, आता माझ्या मेहनतीत कोणतीही कमी राहता कामा नये.”
त्याच्या या अटळ जिद्दीचा आणि अविरत मेहनतीचा परिणाम लवकरच समोर आला. पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा त्याने उत्तीर्ण केली आणि संपूर्ण देशात 26वा क्रमांक पटकावला. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हती. ही एका स्वप्नाची पूर्णता होती, जी त्याने फक्त स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठी पाहिलं होतं. त्याचे वडील जेव्हा त्याच्या यशाची बातमी ऐकून भावूक झाले, तेव्हा त्या अश्रूंमध्ये फक्त आनंद नव्हता, तर एक समाधान, अभिमान आणि संघर्षाचं सार होतं.
प्रदीपचं हे यश फक्त त्याचं वैयक्तिक विजय नव्हतं. हे त्याच्या वडिलांच्या कष्टाचं, त्याच्या आईच्या रात्रीच्या प्रार्थनांचं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या न शरण जाणाऱ्या विश्वासाचं फलित होतं. आज प्रदीप एक यशस्वी IAS अधिकारी म्हणून देशसेवेत कार्यरत आहे. पण यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे, तो आज लाखो तरुणांसाठी एक जीवंत उदाहरण आहे की परिस्थिती कितीही अवघड असली, तरी मनात जर स्वप्न मोठं असेल, आणि त्यासाठी जिद्द आणि शुद्ध निष्ठा असेल, तर कोणतंही ध्येय अशक्य नाही.
प्रदीप स्वतःही सांगतो, “स्वप्नं पाहण्यासाठी खिशात पैसे असावेत असं नाही, पण मन मोठं असावं लागतं. आयुष्यात कितीही अडचणी असल्या, तरी जर आपल्या पाठीवर आईवडिलांचा हात आणि मनात अपार मेहनतीची तयारी असेल, तर कोणतीही परीक्षा आपल्याला हरवू शकत नाही.”