फोटो सौजन्य - Social Media
भारतीय तटरक्षक दलामार्फत सहाय्यक कमांडंट पदभरती 2025 जाहीर झाली असून, ही भरती 2027 बॅचसाठी करण्यात येत आहे. या भरतीत जनरल ड्युटी (GD) आणि तांत्रिक शाखा (इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार 08 जुलै 2025 पासून 23 जुलै 2025 रात्री 11:30 पर्यंत अधिकृत संकेतस्थळ https://joinindiancoastguard.cdac.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ही भरती फक्त अविवाहित भारतीय पुरुष उमेदवारांसाठी असून, संरक्षण क्षेत्रात अधिकारी म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. निवड पद्धत एकूण पाच टप्प्यांमध्ये पार पडते. पहिला टप्पा म्हणजे CGCAT – संगणक आधारित परीक्षा. यात इंग्रजी, गणित-विज्ञान, सामान्य ज्ञान व लॉजिकल रिझनिंग या चार घटकांवर आधारित 100 बहुपर्यायी प्रश्न असतात. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण आणि चुकल्यास 1 गुण वजा केला जातो. यानंतर दुसऱ्या टप्प्यात PSB – प्रीलिमिनरी सिलेक्शन बोर्ड अंतर्गत PPDT (चित्र वाचन व चर्चा चाचणी) आणि कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट घेतली जाते. तिसरा टप्पा म्हणजे FSB – फायनल सिलेक्शन बोर्ड, जो नोएडा येथे 4–5 दिवस चालतो आणि यात मानसशास्त्रीय चाचणी, गट कार्य व मुलाखत घेतली जाते. चौथ्या टप्प्यात दिल्लीतील बेस हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी होईल आणि अंतिम टप्पा म्हणजे डिसेंबर 2026 मध्ये इंडियन नेव्हल अकॅडमी (INA), एझीमाला येथे प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करणे.
पात्रतेसाठी उमेदवाराचे वय 01 जुलै 2026 रोजी 21 ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2001 ते 30 जून 2005 दरम्यान झालेला असावा. जनरल ड्युटीसाठी कोणत्याही शाखेची पदवी (किमान 60%) आणि 12वीत गणित व फिजिक्स आवश्यक आहे. तांत्रिक शाखेसाठी संबंधित विषयात B.E./B.Tech आणि 12वीत गणित व फिजिक्स असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गासाठी ₹300/- आहे, तर SC/ST उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही. अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो (नाव व दिनांकसह), स्वाक्षरी, 10वी, 12वी व पदवी प्रमाणपत्र, तसेच लागल्यास कॅटेगरी, डोमिसाइल किंवा सेवा प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.