फोटो सौजन्य : Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: नागु विरकर यांच्या ‘हेडाम’ कादंबरीचा सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश होणं ही पालघर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे. मोखाडा तालुक्यातील किनीस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख नागु विरकर यांनी लिहिलेली ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बी.ए. दुसऱ्या वर्षाच्या मराठी साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना ‘जिल्ह्याचे भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
‘हेडाम’ ही केवळ कादंबरी नाही, तर ती एक मेंढपाळाच्या जीवनाचा आरसा आहे. या कादंबरीत लेखकाने मेंढपाळांचे दैनंदिन जगणे, त्यांच्या अडचणी, समाजातील वंचितता, शिक्षणापासून दुरावलेली पिढी आणि त्यांच्या मनातील वेदना व आकांक्षा याचं चित्रण अत्यंत वास्तववादी पद्धतीने केलं आहे. या साहित्यकृतीत ग्रामीण जीवनाचा, पशुपालनाचा, देवभोळेपणाचा आणि अंधश्रद्धेचा वेध घेत समाजप्रबोधनात्मक संदेश दिला आहे.
नागु विरकर यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. मूळ सातारा जिल्ह्यातील म्हसवड (मसाईवाडी) गावचे रहिवासी असलेले विरकर हे मेंढपाळाच्या कुटुंबातून आले. त्यांचे शिक्षण केवळ गुरुजींच्या प्रेरणेने सुरू झालं आणि त्यांनी अनेक अडचणींवर मात करत डी.एड पूर्ण केले. नोकरी नसतानाही त्यांनी मेंढपाळाच्या तांड्याबरोबर फिरत शिक्षण सुरू ठेवले. याच वास्तव जगण्यावर त्यांनी ‘हेडाम’ लिहिली, जी आज मराठी साहित्यात महत्त्वाचं स्थान प्राप्त करत आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या भाषा विभागाने अभ्यासक्रम निवडताना या कादंबरीची सखोल चाचपणी करून तिला मराठी कथनात्मक साहित्य आणि आस्वाद या घटकांअंतर्गत स्थान दिलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ आणि ‘माणदेशी माणसं’ या अजरामर कादंबऱ्यांच्या पंक्तीत ‘हेडाम’ही उभी ठाकली आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. नागु विरकर यांचं हे यश ग्रामीण साहित्यप्रेमींना प्रेरणा देणारं आहे. ‘हेडाम’ ही केवळ आत्मकथा नसून ती वंचित समाजाचा आवाज बनली आहे.