फोटो सौजन्य - Social Media
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO अंतर्गत येणाऱ्या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर (NRSC) कडून वैज्ञानिक/अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना ५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, एकूण ३१ पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १० मे २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२५ आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० मे २०२५ रोजी १८ ते २८ किंवा ३० वर्षांदरम्यान असावे, हे वय पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवले आहे. तसेच अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग (OBC), दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू करण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
ISRO NRSC वैज्ञानिक/अभियंता भरतीसाठी निवड प्रक्रिया चार टप्प्यांत पार पडणार आहे. प्रथम, उमेदवारांची लेखी परीक्षा (Written Test) होईल. या परीक्षेत यश मिळवलेल्यांना मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Documents Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) केली जाईल. या चारही टप्प्यांत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
अर्ज कसा कराल?
ISRO NRSC साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर लागणारी कागदपत्रे जसे की फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी तयार ठेवावीत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक ती माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून शेवटी अर्ज सबमिट करून त्याचा प्रिंटआउट काढावा.
ISRO सारख्या भारताच्या अग्रगण्य संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक नामी संधी असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी या भरतीचा नक्की फायदा घ्यावा. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.