फोटो सौजन्य - Social Media
इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा आदर्श मुलांसमोर ठेवत त्यांच्यात सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषद अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून “इतिहास महाराष्ट्राचा : श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक” हा उपक्रम राबवण्यात आला. राज्यभरातील प्राथमिक फेऱ्यांनंतर महाअंतिम फेरी नुकतीच मुंबईच्या यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात पार पडली.
१३ व १४ सप्टेंबर रोजी झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते विनय येडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनावेळी नटराज पूजन व श्री शिवछत्रपतींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शनिवारी झालेल्या समूह सादरीकरणात तब्बल ३६ संघांनी सहभाग घेतला. बालकलावंतांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना थेट शिवकाळात नेल्याची अनुभूती दिली. निकाल जाहीर करताना सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोल्हापूरच्या श्रीराम अकॅडमीला मिळाला. जालन्याच्या श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालयाने उत्कृष्ठ, रत्नागिरीच्या दामले विद्यालयाने उत्तम, तर जळगाव व बीडच्या शाळांनी प्रशंसनीय पारितोषिक पटकावले. याशिवाय धुळ्याच्या ग्रॅव्हिटी डान्स इन्स्टिट्यूटला विशेष नावीन्यपूर्ण सादरीकरणासाठी गौरवण्यात आले.
रविवारी एकल सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. दोन वयोगटांत ६७ बालकलावंतांनी इतिहासातील प्रसंग सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. ५ ते १० वयोगटात लातूरचा आयांश जाधव सर्वोत्कृष्ट ठरला. तर ११ ते १५ गटात मुंबईचा दुर्व दळवीने बाजी मारली. अन्य गटांमध्ये कस्तुरी कार्लेकर, अनुष्का साठे, समर्थ मुंडे, विधित भोसले यांच्यासह विविध जिल्ह्यांतील मुलांनी उत्कृष्ठ कामगिरी करून पारितोषिके पटकावली. विशेष प्रशंसनीय व उल्लेखनीय गटात बीड, ठाणे, कल्याण, नागपूर, जळगाव, रत्नागिरी आदी ठिकाणच्या बालकलावंतांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे सोईतकर, नागसेन पेंढारकर व त्र्यंबक वडसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दीपा क्षीरसागर यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषदेच्या युवा टीमने परिश्रम घेतले. या उपक्रमातून बालकलावंतांनी इतिहासातील शौर्यगाथा रंगमंचावर जिवंत करून दाखवली. मुलांमधील कलागुणांना वाव देत इतिहासाशी त्यांची सांगड घालण्याचा हा उपक्रम प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेला.