फोटो सौजन्य - Social Media
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे नवीन संकेतस्थळ सुरू केले असून, ९ मेपासून ते कार्यान्वित झाले आहे. या संकेतस्थळावरून संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. या नवीन व्यवस्थेनुसार राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १५ मेपर्यंत आपली नोंदणी करून ती प्रमाणीकरणासाठी पाठवावी लागणार आहे. त्यानंतर, १९ मेपासून विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार असून, २८ मेपर्यंत विद्यार्थ्यांना आपली माहिती भरून प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
यापूर्वी फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांमध्येच अकरावीचे प्रवेश ऑनलाइन होत होते. बाकीच्या भागांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रवेश दिला जात होता. मात्र, आता संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे.
शिक्षण विभागाने राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रणाली लागू करताना, या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती आणि नियमावली देखील जाहीर केली आहे. या नियमांनुसार, राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १५ मेपर्यंत आपली नोंदणी करून ती वेळेत प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. यानंतरच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. यापुढे कुठल्याही स्वरूपात ऑफलाइन प्रवेश घेणे वैध मानले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. यामुळे अकार्यक्षमता आणि गैरव्यवहाराला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात असून, निकाल लागल्यानंतरच विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नवी प्रणाली राज्यभरात समान प्रवेश संधी देणारी ठरेल, अशी विभागाची भावना असून, या माध्यमातून प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल, वेळेची मोठी बचत होईल आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अधिक सुलभ, सोयीस्कर आणि न्याय्य होईल, असा शिक्षण विभागाचा ठाम विश्वास आहे.