फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही अधिकृत अधिसूचना ९ मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मेपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ आहे. या भरतीत एकूण ४०० रिक्त पदे भरली जाणार असून, ही एक चांगली संधी आहे स्थानिक क्षेत्रात बँकींग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी १ मे २०२५ ही निर्णायक तारीख मानण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये होणार आहे. प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर स्थानिक भाषेची परीक्षा, मुलाखत आणि शेवटी वैद्यकीय तपासणी. प्रत्येक टप्प्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यास पात्रता मिळेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.iob.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे ‘Recruitment of LBO 2025’ या विभागात ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल. नंतर संपूर्ण माहिती भरून अर्जात पासपोर्ट साइज छायाचित्र, आधार किंवा पॅनकार्ड (ओळखपत्र), वयाचा पुरावा, सेवानिवृत्ती व अनुभव प्रमाणपत्रे, आणि पत्त्याचा पुरावा अशी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्या संग्रही ठेवावी.
अर्जासाठी शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹८५०/- शुल्क आहे, तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी ₹१७५/- शुल्क आकारण्यात आले आहे. अधिक माहिती आणि अद्ययावत अपडेटसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे.