फोटो सौजन्य - Social Media
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला असताना, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कौशल्य विकास विभाग आणि ‘अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार असून, त्यात आपत्ती दरम्यानचे बचाव, आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय प्रक्रिया आणि प्रथमोपचार याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मंत्री लोढा म्हणाले, “आपत्ती ही नैसर्गिक असो वा मानव निर्मित, त्याचे परिणाम मोठे असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. नव्या पिढीला याचे महत्त्व समजून देणे ही काळाची गरज आहे.” याच कार्यक्रमात मंत्री लोढा यांनी आयटीआयमध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणाही केली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-व्ही मॅनेजमेंट, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री-डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
दोन दिवसीय या विशेष शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती काळातील तयारी, प्रतिसाद यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सहभाग याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घेता आला आणि आपल्या जबाबदाऱ्या ओळखता आल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी नागरी संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देत नागरी सुरक्षा व्यवस्थेचे विविध पैलू, आपत्ती वेळी लोकसहभागाचे महत्त्व, पोलिस प्रशासनाची भूमिका आणि आपत्ती दरम्यान शिस्तबद्ध कृतीचे महत्त्व सांगितले.
या शिबिराची सुरुवात डॉ. लीना गडकरी यांच्या सविस्तर मार्गदर्शनाने झाली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमके काय, त्याची मूलभूत तत्त्वे आणि त्याचे आधुनिक तंत्रज्ञानाशी असलेले नाते याचे सविस्तर विवेचन केले. विशेषतः युद्धसदृश परिस्थितीत काय काळजी घ्यावी, कोणती प्राथमिक उपचार पद्धती उपयुक्त ठरते, आणि बचाव कार्याचे प्राथमिक टप्पे कोणते, याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली गेली.
या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः सहभाग घेत बचाव आणि मदत कार्याची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून प्रत्यक्ष कृतीत किती तयार आहेत हे दिसून आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या एस. एस. माने यांनी सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व अशा शिबिरांचे आयोजन भविष्यात सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.