
rishbh
Major Rishabh Sambyal Resign: सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळख निर्माण करणारे आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे माजी ADC राहणारे मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी भारतीय सैन्यातून तडकाफडकी सेवानिवृत्ती घेऊन सर्वांनाच थक्क केले आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात आणि अत्यंत यशस्वी व उज्ज्वल करिअरच्या काळात अचानक वर्दी सोडण्याच्या या निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. NDA पासून ते अत्यंत प्रतिष्ठित ‘पॅरा स्पेशल फोर्सेस’ आणि त्यानंतर थेट राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य सांगणारा आहे.
मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी सैन्याची नोकरी का सोडली, हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण देशभरात आहे. राज शमाणी यांच्या पॉडकास्टमध्ये खुद्द मेजर ऋषभ यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, त्यांच्या आयुष्यात असे काही महत्त्वाचे वळण आले, ज्यामुळे त्यांना हा कठीण निर्णय घ्यावा लागला. त्यांनी सुमारे १२ वर्षे भारतीय लष्करात आपली सेवा दिली, ज्यामध्ये लडाखपासून ते अनेक अत्यंत धोकेदायक मोहिमांचा आणि राष्ट्रपती भवनाच्या कडक प्रोटोकॉलचा समावेश होता.
मेजर ऋषभ सिंग संब्याल यांचा सैन्यातील प्रवास अत्यंत अभिमानास्पद राहिला आहे:
२०१३-२०१४: २०१३ मध्ये NDA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये १३३ व्या कोर्समधून आपले प्रशिक्षण सुरू केले.
२०२१ गणराज्य दिन परेड: २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांनी जाट रेजिमेंटच्या पथकाचे नेतृत्व केले होते आणि ‘बेस्ट मार्चिंग कंटिंजेंट’ची ट्रॉफी जिंकली होती.
पॅरा SF आणि बलिदान बॅज: यानंतर ते भारतीय सैन्याच्या अत्यंत घातक आणि एलिट अशा ‘४ पॅरा स्पेशल फोर्सेस’ चा भाग बनले आणि त्यांनी अत्यंत मानाचा ‘बलिदान बॅज’ मिळवला.
राष्ट्रपतींचे ADC (मार्च २०२३): मार्च २०२३ मध्ये त्यांची देशातील सर्वात गोपनीय व मानाच्या पदांपैकी एक असलेल्या राष्ट्रपतींच्या ADC (Aide-de-Camp) पदी निवड झाली. राष्ट्रपती भवनातील ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशी-विदेशी पाहुण्यांचे स्वागत, पंतप्रधान कार्यालयासोबत समन्वय आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा कडक प्रोटोकॉल अत्यंत चोखपणे सांभाळला. या काळात सोशल मीडियावर त्यांच्या साधेपणाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले, ज्यानंतर ते रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनले.
भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, जर कोणताही अधिकारी किमान २० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झाला, तरच तो पूर्ण पेन्शनसाठी पात्र ठरतो. परंतु, जेव्हा कोणी २० वर्षांपूर्वी म्हणजेच ‘प्री-मॅच्युअर रिटायरमेंट’ घेतो, तेव्हा नियमांमध्ये वेगळ्या तरतुदी असतात.
मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी १२ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत लष्कराच्या नियमांनुसार, त्यांना विशेष तरतुदींअंतर्गत रिटायरमेंट बेनिफिट्स, ग्रॅच्युटी, माजी सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि वैद्यकीय लाभ मिळतील; परंतु त्यांना पेन्शन मिळणार नाही.
सैन्यदल सोडल्यानंतरही उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी कॉर्पोरेट जगतात, स्ट्रॅटेजिक सिक्युरीटी ॲडव्हाइस, युवा सक्षमीकरण आणि लीडरशिप क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असतात. मेजर ऋषभ सिंग संब्याल यांनी स्वतः संकेत दिले आहेत की, ते येणाऱ्या काळात देशातील तरुणांना प्रेरित करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्माणाच्या एका नवीन प्रवासावर काम करतील.