
फोटो सौजन्य - Social Media
नीता परब: मिशन मेरिट’ उपक्रम अंतर्गत मुंबई महानगरपालिका व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या (Career) शाळांतील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून “गणित गुरुवार” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी संथ प्रतिसाद दिला असला तरीही, सष्टेंबरपासून या उपक्रमाने चांगलाच वेग घेतला आहे. सुरुवातीला वीस हजाराच्या आसपास विद्यार्थीचा या उपक्रमात सहभाग नाेंदविण्यात आला हाेता. पण आता सुस्साट सुरु असलेल्या या उपक्रमात जुलैपासून आतापर्यंत ७५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना डाेकेदुुखी ठरणाऱ्या गणित, विज्ञान विषयात रुची निर्माण हाेत आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान किमान तीस मिनिटे खान अकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करतात. विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य मिळवावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
घरी सातत्यपूर्ण शिक्षणाचा अभिनव उपक्रमाला सष्टेंबरपासून गती मिळाली असून सप्टेंबर महिन्यात प्रत्येक गुरुवारी सरासरी १५,००० हून अधिक विद्यार्थी या उपक्रमात भाग घेत आहेत. ऑक्टोबर महिन्यात (पहिल्या सत्राची परीक्षा आणि दिवाळीच्या सुट्ट्या) सुमारे २९,००० विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाचा सराव केला आणि ४७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दर आठवड्याला ३० मिनिटापेक्षा अधिक वेळ दिला आहे. पालकांच्या वाढत्या जागरूकतेमुळे शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे शिक्षाणिकारी सुजाता खरे सांगतात.
दुसऱ्या सत्रानंतर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची वाढ
दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर गणित गुरुवार उपक्रमातील सहभागाच्या बाबतीत वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी (६ नोव्हेंबर) ६००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याची सकारात्मक बाब दिसून आली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणित गुरुवार हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी दर गुरुवारी गणिताचा सराव करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरी नियमित सरावाची सवय लागते आणि गणित विषयाची भीती कमी होत आहे. पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष पालक सभा सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक स्क्रीनटाईमचा उपयोग कसा करावा हे समजण्यास मदत होत आहे. या वर्षी दिवाळी सुट्ट्यांमध्ये देखील हजारो विद्यार्थ्यांनी नियमित पणे आपल्या घरी गणित आणि विज्ञान विषयाचा सराव केला आहे ही सकारात्मक बाब आहे – डाॅ. प्राची जांभेकर (उपायुक्त, शिक्षण)
या प्लॅटफॉर्म वर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती मॉड्यूल उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अधिक सराव प्रश्न दिले आहेत. सध्या सुमारे ३,००० विद्यार्थी या मॉड्यूलचा सक्रियपणे वापर करत आहेत.