
फोटो सौजन्य - Social Media
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमास महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेचे सहकार्य लाभणार आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा प्रभावी मंच उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्य ‘हब’ उभारण्यात येणार असून शहरातील महाविद्यालये, समुदाय केंद्रे व सांस्कृतिक संस्थांमध्ये ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. नेतृत्व संवाद, परिसंवाद, इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धा आणि उपाययोजना प्रदर्शन असे विविध उपक्रम या तीन दिवसांत पार पडतील. कार्यक्रमाची मांडणी अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी शाश्वतता या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना म्हटले की, “मुंबई क्लायमेट वीक भारताची हवामान विषयक कृतीशील भूमिका अधोरेखित करतो. शासन, उद्योग, वित्त संस्था, तज्ज्ञ आणि युवक यांना एकत्र आणून महाराष्ट्र शाश्वत भविष्य घडवण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश या मंचातून दिला जाईल.” प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सहभागातून उभी राहणारी ही देशातील पहिली व्यापक हवामान चळवळ ठरेल.”
पहिल्या दिवशी प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतील ‘अर्थशॉट प्राईज’ सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. एनएसईच्या सहकार्याने आयोजित इनोव्हेशन चॅलेंजमध्ये निवडलेल्या कल्पनांना धोरणकर्ते व गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
या उपक्रमात ३० हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, राजीव शाह, सचिन तेंडुलकर यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच विविध केंद्रीय मंत्री, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँक प्रमुख भागीदार तर डेलॉइट धोरणात्मक ज्ञान भागीदार आहे; टीआयएसएस व आयआयटी मुंबई शैक्षणिक भागीदार म्हणून सहकार्य करणार आहेत.