फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्रातील तब्बल ३८८ खासगी शाळा अनधिकृतरित्या चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ८८ शाळा, लातूर जिल्ह्यात एक, तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिली. शासनाने अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेद्वारे गेल्या दोन वर्षांत ११७ अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात ६४ प्राथमिक आणि २४ माध्यमिक, असे एकूण ८८ शाळा अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत. त्यापैकी ४१ शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, उर्वरित शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील एकमेव अनधिकृत शाळेला दंड आकारण्यात आला आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ शाळांपैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११ शाळांपैकी ६ शाळांना मान्यता मिळाली, तर ५ शाळांना इरादापत्र देण्यात आले आहे.
राज्यातील अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले आहेत. २०१० च्या शासन निर्णयानुसार, २०१३ पूर्वी स्थापन झालेल्या आणि नियमांचे पालन करणाऱ्या शाळांना मान्यता मिळू शकते. मात्र, २०१३ नंतरच्या बेकायदा सुरू असलेल्या शाळांनी शिक्षण कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे लागेल, अन्यथा त्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल.
शिक्षणमंत्री भूसे यांनी स्पष्ट केले की, निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना मान्यता दिली जाईल, मात्र अनधिकृत शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतर मान्यताप्राप्त शाळांत समायोजन केले जाईल. पालकांनीही आपल्या पाल्यांचे शिक्षण अधिकृत शाळांमध्ये होत आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शासन कठोर पावले उचलत आहे. अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पालकांनी अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घेण्याची खबरदारी घ्यावी.