फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत “मुंबई रायजिंग क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या कार्यक्रमात भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचे संकेत मिळाले. या उपक्रमांतर्गत पाच जागतिक कीर्तीची परदेशी विद्यापीठे ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली आणि स्कॉटलंड येथील मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची उभारणी करणार असून, त्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान “Foreign Universities in India: A New Frontier for Industry and Academic Collaboration” या विषयावर परिसंवाद पार पडला. यामध्ये ब्रिटिश कौन्सिलच्या भारतातील संचालक अॅलिसन बारेट आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयातील शिक्षण सल्लागार जॉर्ज थिव्हिओस यांनी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संधी, सहकार्याची गरज आणि जागतिक स्तरावरील भारतीय नेतृत्वाच्या भूमिकेवर आपले विचार मांडले.
अॅलिसन बारेट यांनी सांगितले की, मुंबई ही केवळ आर्थिक केंद्र नसून सर्जनशीलतेचाही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे येथे परदेशी विद्यापीठांसोबतचे सहकार्य हे केवळ शैक्षणिक नसून सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरणार आहे. युके सरकारचा सर्जनशील उद्योगांवर भर असल्याने भारतातील पारंपरिक ज्ञान, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांमध्ये त्यांना मोठी संधी दिसते. “पूर्वी ब्रेन ड्रेन होता, आता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ सुरू आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
जॉर्ज थिव्हिओस यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांच्या दृढ होत चाललेल्या भागीदारीवर प्रकाश टाकला. IIT मुंबई-मोनाश, TISS-मोनाश यांसारख्या संस्थात्मक सहकार्यामुळे भारतात आधीच भक्कम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. एका विद्यापीठाची १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक थेट एक अब्ज डॉलर्सच्या GDP वाढीस कारणीभूत ठरते, असे ऑक्सफर्डच्या संशोधनाचा हवाला देत त्यांनी नमूद केले. ही सुरुवात म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर भारताच्या आर्थिक आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. या उपक्रमामुळे भारतात दर्जेदार शिक्षण मिळवण्याचे स्वप्न आता देशातच पूर्ण होणार आहे.