
फोटो सौजन्य - Social Media
राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्यातील एकूण १३ अकृषी विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठाने प्रशासकीय सुधारणा निकषांमध्ये सर्वाधिक १०० पैकी ८० गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य शासनाने विविध शासकीय कार्यालये, संस्था आणि विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली असून, त्यात मुंबई विद्यापीठाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करत असताना, पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासन निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त असलेल्या मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कार्यप्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले.
१५० दिवस चाललेल्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात कार्यालयीन कामकाजातील गती, सेवा देण्याची गुणवत्ता, वेळेचे नियोजन, नागरिकाभिमुख प्रशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासारख्या विविध निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले. या सर्व निकषांवर मुंबई विद्यापीठाने प्रभावी कामगिरी करत राज्यात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.
या यशामागे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ प्रशासनाने प्रशासकीय सुधारणा राबविताना कार्यपद्धती अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर दिला. विशेषतः मानव संसाधन विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्ड आणि त्यांच्या चमूने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, सेवाविषयक प्रक्रियांचे डिजिटायझेशन, तक्रार निवारण प्रणाली अधिक प्रभावी करणे आणि प्रशासन व विद्यार्थी-नागरिक यांच्यातील संवाद सुलभ करणे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत राज्य शासनाकडून लवकरच प्रशासकीय विभागांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा सन्मान विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेसह, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदार प्रशासनाचे प्रतीक ठरणार आहे. प्रशासकीय सुधारणा गुणांकनात मिळालेले हे यश मुंबई विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून, भविष्यातही विद्यार्थी, शिक्षक आणि समाजासाठी अधिक सक्षम, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देण्याची प्रेरणा देणारे ठरणार आहे.