
फोटो सौजन्य - Social Media
समाजात देहदान, नेत्रदान आणि त्वचादानाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी तसेच या प्रक्रियांविषयी योग्य माहिती देण्यासाठी नायर रुग्णालयातील डिपार्टमेंट ऑफ अॅनॅटोमीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नायर हॉस्पिटल परिसरातील कॉलेज बिल्डिंगमधील हिस्टोलॉजी लॅब, पाचव्या मजल्यावर हा प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देहदान, नेत्रदान व त्वचादान या संवेदनशील विषयांबाबत समाजभान निर्माण करणे आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शास्त्रीय व व्यवहार्य माहिती देणे हा होता. विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. युवराज भोसले (प्राध्यापक व प्रमुख समन्वयक) यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत देहदानासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांचा सभागृहात परिचय करून दिला. देहदान प्रक्रियेतील वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यानंतर डॉ. सुमेध सोनवणे (प्राध्यापक) यांनी देहदान या विषयावर सादर केलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून संपूर्ण कार्यपद्धतीचे सखोल मार्गदर्शन केले. देहदान कसे स्वीकारले जाते, त्यानंतर त्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी कसा उपयोग होतो, याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन डॉ. सुभाष अभ्यंकर (मसीना हॉस्पिटल) यांनी त्वचादानाचे महत्त्व स्पष्ट करत त्वचेची वास्तविक गरज, त्याची टंचाई आणि उपलब्धतेनुसार होणारा वापर याविषयी माहिती दिली. अपघातग्रस्त, भाजलेल्या रुग्णांसाठी त्वचादान किती जीवनदायी ठरते, यावर त्यांनी भर दिला.
डॉ. गिरीश मिरजकर (सह प्राध्यापक, प्लास्टिक सर्जन) यांनी सर्जिकल कौशल्य प्रयोगशाळेत त्वचादानाचा वापर कसा केला जातो, याची माहिती दिली. त्वचा दुर्मिळ असल्याने तिचा प्रत्येक तुकडा योग्य प्रकारे वापरण्यासाठी घेतली जाणारी काळजी, त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नेत्रदान विषयावर डॉ. नयना पोतदार यांनी मार्गदर्शन केले. नेत्रदान प्रक्रिया, त्याआधी घ्यावयाची काळजी, वेळेचे महत्त्व आणि आवश्यक तयारी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत, नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी देहदान, नेत्रदान व त्वचादानाबाबत समाजात असलेल्या भीती व गैरसमज दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणती दक्षता घ्यावी, यावर चर्चा करण्यात आली. वेळप्रसंगी तत्परता आणि योग्य माहिती देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरला असून, यामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.