फोटो सौजन्य - Social Media
नागपूरच्या मिहान (मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ) क्षेत्रात ‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’ सुरू होणार आहे. ९ मार्च २०२५ पासून या प्लांटचे संचालन सुरू होईल. या फूड प्रोसेसिंग युनिटसाठी भूमिपूजन सप्टेंबर २०१६ मध्ये झाले होते. सध्या पतंजलीच्या नागपूर प्लांटमधून थेट आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे ५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. पुढील काळात प्लांटचा विस्तार होत असताना ही संख्या झपाट्याने वाढेल आणि लवकरच १० हजारांहून अधिक युवकांना रोजगार मिळणार आहे.
पतंजलीने नागपूरलाच या प्लांटसाठी का निवडले यामागे ठोस कारण आहे. नागपूर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध असल्याने येथे ‘सिट्रस प्रोसेसिंग प्लांट’ उभारण्यात आला आहे. येथे संत्री, कीनू, मोसंबी, लिंबू यांसारख्या सिट्रस फळांपासून ज्यूस, ज्यूस कन्संट्रेट, पल्प, पेस्ट आणि प्युरी तयार करता येईल. या प्लांटमध्ये दररोज ८०० टन फळे प्रक्रिया करून फ्रोजन ज्यूस कन्संट्रेट तयार करता येईल. हा ज्यूस १०० टक्के नैसर्गिक असून कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह किंवा साखर त्यात मिसळले जाणार नाही.
या प्लांटमध्ये केवळ सिट्रस फळेच नव्हे, तर ट्रॉपिकल फळे व भाज्यांचीही प्रक्रिया केली जाईल. दररोज आवळा ६०० टन, आंबा ४०० टन, अमरूद २०० टन, पपई २०० टन, सफरचंद २०० टन, डाळिंब २०० टन, स्ट्रॉबेरी २०० टन, प्लम २०० टन, नाशपाती २०० टन, टोमॅटो ४०० टन, दुधी ४०० टन, कारले ४०० टन, गाजर १६० टन आणि कोरफड १०० टन प्रक्रिया केली जाईल. या प्रक्रियेला प्रायमरी प्रोसेसिंग असे म्हणतात. याशिवाय, रिटेल पॅकिंगसाठी येथे टेट्रा पॅक युनिट स्थापन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्राहकांना उच्च प्रतीचे उत्पादने मिळतील.
पतंजलीच्या या प्लांटची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथे कचऱ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे केले जाते. संत्र्याचा ज्यूस काढल्यानंतर उरलेले टरफले फेकले जात नाहीत. या टरफलांपासून कोल्ड प्रेस ऑइल (CPO) काढले जाते, ज्याला बाजारात मोठी मागणी आहे. तसेच, नागपूर ऑरेंज बर्फीसाठी प्रीमियम पल्पचा उपयोग केला जातो. याशिवाय, ऑयल बेस्ड आणि वॉटर बेस्ड अरोमा एसेंस तयार केला जातो. सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांसाठी संत्र्याच्या टरफलांचे पावडरही तयार केले जाते. या प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. फळे व भाज्यांच्या प्रक्रियेमुळे त्यांना चांगला दर मिळेल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पतंजलीच्या या मेगा फूड पार्कमुळे नागपूर हे भारतातील एक प्रमुख फूड प्रोसेसिंग हब म्हणून ओळखले जाईल.