फोटो सौजन्य - Social Media
आज 8 मार्च, जागतिक महिला दिन! सर्व मातांना, भगिनींना, मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला या विशेष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा! ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते.
आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे, तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठीही खास आहे. कारण स्त्री एक मार्गदर्शक आहे. समर्थक आहे. प्रेरणादायी व्यक्ती आहे. ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, तर कधी जीवनसाथी म्हणून असते. तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत, कारण त्या नसत्या तर आपले जीवन अपूर्ण राहिले असते!
म्हणतात ना, प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि ही गोष्ट खरीच आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा सहकारी—स्त्री आपल्या विविध भूमिकांतून आपल्या आयुष्याला दिशा देते, पाठिंबा देते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ ‘चूल आणि मूल’ या मर्यादेत पाहिले जात असे. मात्र, आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण, व्यवसाय, संशोधन, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्या केवळ घराचे घरपण जपत नाहीत, तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे!
“ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण,
ती नसेल सोबत तर जीवन आपले अपूर्ण,
तिच्यामुळेच आपल्या घराला आहे घरपण,
तिच्याविना आपले सुने सारे जीवन.”
खरचं! घरात एकही स्त्री नसेल तर आपले आयुष्य नरक बनून जाते. आपल्या घरांना आणि आयुष्याला स्वर्ग बनवण्याचे काम स्त्रिया करतात. काही स्त्रिया तर भर पहाटे उठून स्वतः स्वयंपाक करतात. सगळं काही आटपून कामाला निघतात. संध्याकाळी कष्ट करून घरी परततात आणि घरी परतून पुन्हा घरच्या किंवा इतर कामाला लागतात. त्यांचे संपूर्ण दिवस फक्त कष्टात जाते. खरचं! या स्त्रियांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. या स्त्रिया देवाने आपल्यासाठी पाठवलेले देवदूत आहेत.
धन्यवाद!
आदरणीय व्यासपीठ, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो,
आज जागतिक महिला दिन! हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा, तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने, त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे.
आज आपण कल्पना चावला, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्वान महिलांना आदराने स्मरण करूया. त्यांनी आपल्या कार्यांनी समाजात मोलाचे योगदान दिले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
महिला म्हणजे केवळ शक्ती नाही, तर ती करुणा आणि प्रेमाचा झरा आहे. आजच्या काळात महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढा देणे गरजेचे आहे.
चला, आज आपण सर्व महिलांना सन्मान देऊ आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करूया.
धन्यवाद!