फोटो सौैजन्य - Social Media
प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे संघर्षाची एक अनकही कहाणी असते. बिहारमधील फुलवारी शरीफ तालुक्यातील कुरकुरी गावात जन्मलेली प्रिया राणी हिची देखील गोष्ट अशीच आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या प्रियाच्या डोक्यात मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न होतं. पण तिच्या गावात मुलींच्या शिक्षणाला अजूनही फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. प्रिया शाळेत जाण्याच्या वयात असताना गावात चर्चा सुरू झाली. “मुलीला एवढं शिकवून काय उपयोग?” काहींनी तिच्या वडिलांना टोमणे मारले, काहींनी थेट विरोध केला. पण प्रियाच्या आजोबांनी (गावातील शेतकरी) एक वेगळी भूमिका घेतली. त्यांनी म्हणलं, “प्रिया शिकेल, मोठी होईल आणि आपल्या गावाचं नाव उज्वल करेल.” या विश्वासावर त्यांनी तिला पटण्याला पाठवलं.
पटण्यात, प्रियाने एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहून शिक्षण सुरू केलं. शाळा ते कॉलेजपर्यंतचा प्रवास तिनं स्वतःच्या जिद्दीवर पार केला. B.IT मेसरा येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करताच तिनं यूपीएससी परीक्षा देण्याचं ठरवलं. पहिल्याच प्रयत्नात हाती अपयश आलं. दुसऱ्यांदा देखील यश मिळालं नाही. मनात शंका निर्माण झाली होती. “मी खरंच योग्य आहे का?” पण वडिलांनी विश्वास दिला, “प्रत्येक अपयश तुझ्यातील ताकद वाढवतंय.” तिसऱ्या प्रयत्नात तिला AIR 284 रँक मिळाली. पण प्रिया समाधानी नव्हती. तिचं ध्येय होतं प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च स्थान गाठणं.
प्रिया म्हणते, “मी परत अभ्यासाला लागले. स्वतःच्या चुका ओळखल्या आणि पुढचा प्रयत्न हे अंतिम म्हणून घेतलं.” अखेर 2023 मध्ये तिला AIR 69 रँक मिळाली आणि ती IAS अधिकारी बनली. आज ती हिमाचल प्रदेशात इंडियन डिफेन्स सर्व्हिसमध्ये कार्यरत आहे.
आज जे गाव तिच्या शिक्षणाच्या विरोधात होतं, तेच गाव तिचं कौतुक करतं. तिचं उदाहरण घेतं. प्रिया म्हणते, “स्वप्नं मोठी असावीत, पण त्या मागे जिद्द आणि संयम हवे. मी 12th Fail नाही, पण माझी परीक्षा ही समाजाच्या विरोधात होती.”